Wed, Jul 24, 2019 12:12होमपेज › Konkan › सिंधुदुर्गातील ८६७ शाळा ‘अ’ श्रेणीत 

सिंधुदुर्गातील ८६७ शाळा ‘अ’ श्रेणीत 

Published On: Dec 23 2017 2:06AM | Last Updated: Dec 22 2017 10:45PM

बुकमार्क करा

ओरोस : प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या शाळा सिद्धी योजनेंतर्गत राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या स्वयंमूल्यांकनात महाराष्ट्र राज्य अव्वल असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 867 शाळा ‘अ’ श्रेणीत आल्या आहेत. लवकरच बाह्य संस्थेमार्फत या शाळांची  तपासणी होणार आहे. 

महाराष्ट्र राज्य विद्या परिषदेमार्फत सर्वेक्षण होणार्‍या शाळांच्या स्वयंमूल्यांकनानंतर आता केंद्र शासनाने शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यानुसार राज्यातील प्राथमिक, पूर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचे सर्वेक्षण करण्याचे केंद्र शासनाने ठरविले. 

शाळा सिद्धी योजनेंतर्गत शाळा स्वयंमूल्यांकन संकेतस्थळावर माहिती भरावयाची होती. त्यानुसार 199 गुणांच्या प्रश्‍नांवर 7 छत्र व अन्य उपछत्र माहिती द्यायची होती. राज्यातील अशा सर्वच प्राथमिक, पूर्ण प्राथमिक, माध्यमिक शाळांनी ही माहिती भरत स्वयंमूल्यांकन करण्यात आले. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1771 शाळांचा समावेश होता. या स्वयंमूल्यांकनात सिंधुदुर्गातील 867 शाळांनी ‘अ’  श्रेणी मिळविली आहे. 

मुलांना सर्वोत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी व शाळांची गुणवत्ता प्रमाणित करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाच्या या शाळा सिद्धी योजनेत सहभाग घेतला आहे. त्यानुसार शाळांना भौतिक सुविधा, आवश्यक शौचालय, पटसंख्या, शिक्षक संख्या, संगणकसुविधा, प्रगती याबाबत माहिती गोळा करण्याचे सूचना दिल्या होत्या. या अहवालानुसार जिल्ह्यातील शाळांची ‘अ’ श्रेणीत संख्यावाढ होत असल्याचे दिसून येते. उर्वरित ‘ब’ व ‘क’मधील शाळा ‘अ’श्रेणीत आणण्यासाठी जि. प.मार्फत  विशेष प्रयत्न केले जात जात आहेत. या शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत 999 गुणांची प्रश्‍नावली होती. त्यात 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या शाळांचा समावेश   ‘अ’ श्रेणीत  आहे. या उपक्रमात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल आहे.