Fri, Jul 19, 2019 13:54होमपेज › Konkan › रत्नागिरी जिल्ह्यात केवळ ४३६ विद्यार्थी ‘टीईटी’धारक

रत्नागिरी जिल्ह्यात केवळ ४३६ विद्यार्थी ‘टीईटी’धारक

Published On: Aug 30 2018 1:19AM | Last Updated: Aug 29 2018 9:21PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

शासनाने सन 2013 पासून शिक्षण भरतीसाठी टीईटी (शिक्षक पात्रता) परीक्षा अनिवार्य केली आहे. यामुळे गेल्या पाच वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातील 16,076 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. त्यांपैकी केवळ 436 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या वर्षी परीक्षा दिलेल्या 1288 विद्यार्थ्यांचा निकाल अजून जाहीर झालेला नाही. जिल्ह्यात शिक्षकांच्या 600 पेक्षा अधिक जागा रिक्‍त आहेत. रिक्‍त जागा पाहता टीईटीधारकांची संख्या कमीच दिसून येत आहे. 

बालकांचा मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा अधिकार, अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरिता शिक्षक पात्रता परीक्षा सन 2013 पासून अनिवार्य करण्यात आली आहे. यामध्ये कनिष्ठ प्राथमिक म्हणजेच पहिली ते पाचवी व वरिष्ठ प्रथमिक म्हणजेच सहावी ते आठवी या दोन गटातील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्‍नपत्रिका राहणार आहे. दोन्ही गटांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांना दोन्ही प्रश्‍नपत्रिका सोडविणे आवश्यक असते. 

सन 2010 पासून शिक्षक भरती बंद असल्याने डीटीएड् झालेल्या विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तर डीटीएड्, बीएड् झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. परंतु, टीईटी हे केवळ पात्रता प्रमाणपत्र आहे. त्यानंतरही शिक्षकाची नोकरी मिळण्याची हमी नसते तर अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी शिक्षक होण्यास पात्र असतात. परंतु, टीईटी उत्तीर्ण झाल्यानंतर अभियोग्यता चाचणी परीक्षा देता येते. परंतु, फार कमी विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होतात. 

सन 2013 मध्ये पहिल्याच वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील सहा हजार विद्यार्थी टीईटी परीक्षेला बसले होते. त्यांपैकी 213 उत्तीर्ण झाले. सन 2014 मध्ये 3958 विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी 62 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर सन 2016 मध्ये 2387 विद्यार्थी परीक्षेला बसले त्यांपैकी 60 उत्तीर्ण झाले. तर सन 2017 मध्ये 2443 विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी केवळ 101 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी आहे.