Wed, Jul 24, 2019 02:04होमपेज › Konkan › राजापूर शहर होणार पाणीटंचाईमुक्‍त

राजापूर शहर होणार पाणीटंचाईमुक्‍त

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

राजापूर : प्रतिनिधी

शहरातील पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेल्या कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या जागी नवीन धरण उभारण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजेनंतर्गत 10 कोटी रूपये मंजूर झाले आहेत. विधानपरिषद आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा विशेष निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती प्रभारी नगराध्यक्ष अ‍ॅड.जमीर खलिफे यांनी दिली. निधी उपलब्ध झाल्याने लवकरच याठिकाणी नवीन धरणाचे काम मार्गी लागणार असून राजापूर शहराचा पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी निकाली लागणार आहे. 

ब्रिटिश राजवटीत 1878 साली बांधण्यात आलेल्या कोदवली येथील सायबाच्या धरणाची सद्य:स्थितीत पार दुरवस्था झाली आहे. शहराला ग्रॅव्हिटीने पाणीपुरवठा करणार्‍या या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने तसेच धरणाला गळती लागल्याने शहरावासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सुमारे 137 वर्षे जुने असलेले सायबाचे धरण जीर्ण झाल्याने केव्हाही फुटण्याची शक्यता आहे. शिवाय या धरणात साचलेल्या गाळामुळे उन्हाळ्यात धरण कोरडे पडतेे.

दरवर्षी भेडसावणार्‍या पाणीटंचाईवर मात करायची झाल्यास कोदवली धरणाच्या जागी नवीन धरणाची उभारणी करणे अत्यंत गरजेचे बनले होते. त्यामुळे कोणत्याही स्थितीत नवीन धरणासाठी निधी मिळवायचा आणि शहरवासीयांना टंचाईतून मुक्‍त करायचे, असा निर्धार विधानपरिषद आमदार खलिफे यांनी केला होता. त्यानुसार त्यांनी नवीन धरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यातच खलिफे यांच्या प्रयत्नांना यश येताना राजापूर नगरपरिषदेला नवीन धरणासाठी 10 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. 

राज्यातील नगरपरिषदांना 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी सुमारे 68 कोटी 97 लाख रूपये निधी देण्यात आला आहे. त्यांपैकी सुमारे 10 कोटी रूपयांचा निधी राजापूर शहरातील नवीन धरणासाठी देण्यात आल्याचे प्रभारी नगराध्यक्ष अ‍ॅड.जमीर खलिफे यांनी सांगितले. नवीन धरण बांधण्याच्या द‍ृष्टीने प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या असून सद्य:स्थितीत कोदवली धरण परिसराच्या भूजल सर्व्हेसाठी 14 व्या वित्त आयोगातून 17 लाख 40 हजार रूपये तरतूद करण्यात आल्याचेही जमीर खलिफे यांनी सांगितले.

URL : 


  •