Mon, Apr 22, 2019 12:20होमपेज › Konkan › आसोलीत आंबा- काजूची 900 कलमे जळून खाक

आसोलीत आंबा- काजूची 900 कलमे जळून खाक

Published On: Apr 12 2018 1:20AM | Last Updated: Apr 11 2018 10:34PMवेंगुर्ले : प्रतिनिधी  

आसोली-न्हैचीआड  येथील माळरानावरील कलम बागांना बुधवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत येथील तीस बागायतदारांच्या दहा एकर जागेतील सुमारे 900 आंबा व काजूची कलमे जळून गेली. तसेच  पाण्याच्या टाक्या व अन्य साहित्यही जळून राख झाल्याने सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वेंगुर्ले नगरपालिकेचा अग्निशमक बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला व आग आटोक्यात आणली.. 

आसोली-न्हैचीआड आबोम येथील एकमेकांना लागूनच असलेल्या आंबा- काजू कलमांना दुपारी अचानक आग लागली. आग कशा मुळे लागली याचा उलगडा होऊ शकला नाही. आगाची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेत आग विझवण्याचा आपल्या परिने प्रयत्न केला. याच दरम्यान वेंगुर्ले नगरपरिषदेचा बंबही घटनास्थळी दाखल झाला. त्यामुळे सांयकाळी 4.30 वा. पर्यंत आग आटोक्यात  आली. मात्र, तोपर्यंत आंबा, काजूची मिळून सुमारे 900 कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.  ऐन उत्पादन हंगामात हातातोंडाशी आलेला घास या आगीच्या संकटामुळे हिरावून गेल्याने बागायतदार संकटात सापडले आहेत.  वेंगुर्ले पोलिस स्टेशनचे  श्री कोळेकर, तलाठी एस. बी. गावडे, सरपंच रिया कुडव यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. दरम्यान गावडे यांनी केलेल्या पंचयादी मध्ये या आगीत आंब्याची सुमारे 600 कलमे व काजूची सुमारे 300 कलमे तसेच इतर पाण्याच्या टाक्या व अन्य साहित्य जळून गेल्याचे म्हटले आहे. 

Tags : Konkan, Asoli, mango, cashew, trees,  burned