Thu, Apr 25, 2019 23:29होमपेज › Konkan › नद्यांच्या गाळ उपशावरील 14 कोटी पाण्यात

नद्यांच्या गाळ उपशावरील 14 कोटी पाण्यात

Published On: Jan 23 2018 10:23PM | Last Updated: Jan 23 2018 10:17PMरत्नागिरी : प्रतिनिधी

नद्यांची खोरी समृद्ध करण्यासाठी  त्यांची क्षमता पूर्णपणे वापरात आणण्यासाठी दोन वर्षांपूर्वी गाळात रुतलेल्या नद्यांसाठी राबविण्यात आलेल्या गाळमुक्‍ती मोहिमेनंतर पुन्हा नद्या गाळाने रुतल्याने यासाठी खर्च करण्यात आलेले सुमारे 14  कोटी रुपयांचा निधी पाण्यात गेला आहे. गाळमुक्‍ती अभियानासाठी राबविण्यात आलेलेल उपक्रम कागदावरच राहिल्याने जिल्ह्यातील जगबुडीसह अन्य प्रमुख 7  नद्यांची  गाळाची समस्या ‘जैसे थे’ आहे. गेल्या पावसाळ्यात या नद्यांनी पूररेषा ओलांडत पूरस्थिती निर्माण केली होती.

अलीकडेच रत्नागिरीत झालेल्या एकात्मिक राज्य जल आराखड्याच्या जनसुनावणीत नद्यांच्या गाळाची समस्या पुन्हा अधोरेखित झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी वाशिष्ठी, शास्त्री, काजळी, कोदवली तसेच मुचकुंदी या उपखोर्‍यांचा एकात्मिक राज्य जल आराखडा प्रारूप स्वरूपात तयार करण्यात आला आहे. मात्र, या आराखड्याला मान्यता देताना गाळाची प्रमुख समस्या अडचणीची झाली आहे.

जिल्ह्यात खेडमध्ये असलेल्या जगबुडीसाठी दोन वर्षांपूर्वी गाळ मुक्‍तीची मोहीम प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आली होती. यासाठी जगबुडीचे पात्र आणि तिचा प्रवाह मार्ग  सुकर करताना  हजारो टन गाळ काढण्यात आला होता. तसेच या नद्यांच्या प्रमुख स्थळांवर जलपर्यटन आणि उद्याने तयार करण्याचा प्रस्ताव गाळमुक्‍ती मोहिमेत ठेवण्यात आला होता. मात्र, या योजना कागदावरच राहिल्याने जगबुची गाळाची समस्या  ‘मागील पानावरुन पुढे’ सुरूच राहिली आहे.

सध्या खेड तालुक्यातील जगबडीच पात्र झाड झुडपांनी वेढले असून नेक भागात बांधकामातील भराव टाकल्याने बाधित झाले आहे. त्यामुळे गेल्या पावसाळ्यात जगबुडीने पूररेषा ओलांडली होती. गेल्या पावसाळ्यात जगबुडी, चिपळुणातील वाशिष्ठी,  रत्नागिरीतील काजळी, राजापुरातून वाहणारी कोदवली,  संगमेश्‍वरातील शास्त्री, सोनवी,  लांजातील मुचकुंदी आदी नद्यांचा जलस्तर इशारा पातळीकडे झेपावला होता. या नद्यांच्या गाळांचा प्रश्‍न पुन्हा नुकत्याच झालेल्या जल आराखडा परिषदेच्या जनसुनावणीतही तयार करण्यात येणार्‍या आराखड्यातही अडचणीचा ठरला.