Sun, Aug 18, 2019 21:08होमपेज › Konkan › महामार्गाच्या परिस्थितीत सुधारणा

महामार्गाच्या परिस्थितीत सुधारणा

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 05 2018 8:29PMरत्नागिरी : प्रतिनिधी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली असून महामार्गाचा नकाशा तयार करुन ग्रीड, यलो, रेड असे तीन झोन तयार करण्यात आले आहेत. या झोननुसार खड्डे भरण्यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. 8 सप्टेंबरला बांधकाम मंत्री पुन्हा पाहणी करणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. पाऊस संपल्यावर रस्ता कारपेटचा करण्याकडेही आपला कटाक्ष राहणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांची दखल न्यायालयालाही घ्यावी लागली. त्यानंतर जाग आलेल्या शासनाने तातडीने खड्डे भरण्याची सूचना दिली होती. बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई ते झारापपर्यंत पाहणी केली.  रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही दोन वेळा कशेळी ते खारेपाटणपर्यंतच्या रस्त्याचा आढावा घेतला. खड्डे भरण्याचे काम वेगाने सुरु आहे. याचदरम्यान पाऊस पडत असल्याने त्याचाही परिणाम कामावर होत आहे. मात्र, गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची परिस्थिती सुधारलेली असेल, असे मत त्यांनी व्यक्‍त केले.

खड्डे वारंवार पडण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी ठेकेदाराला कामगार त्याच ठिकाणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खड्डे पडल्यास तत्काळ भरण्याचे आदेश दिले आहेत. खड्ड्यांची परिस्थिती लक्षात येण्यासाठी महामार्गाचा नकाशा तयार करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी रस्त्याची परिस्थिती चांगली आहे. त्या ठिकाणी हिरवा रंग, खड्डे भरले गेलेत त्या ठिकाणी पिवळा तर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत त्या ठिकाणी लाल रंग देण्यात आला असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.  दरम्यान, दि. 8 सप्टेंबरला बांधकाम मंत्री  चंद्रकांत पाटील पुन्हा महामार्गाची पाहणी करणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.ज्या ठिकाणी खड्डे भरले गेले आहेत, त्या ठिकाणी तारखेसह फलक लावण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.