Sat, Dec 14, 2019 01:59होमपेज › Konkan › मासेमारी बंदीचा कडक अंमल करा

मासेमारी बंदीचा कडक अंमल करा

Published On: May 27 2019 1:34AM | Last Updated: May 27 2019 1:34AM
मुंबई ः प्रतिनिधी

सागरी मासेमारी नियंत्रण कायद्यानुसार 1 जून ते 31 जुलै या कालावधीत यंत्रचलित नौकांना मासेमारी करण्यास असलेल्या बंदीची कठोर अंमलबजावणी व्हावी, म्हणून ऑल इंडिया पर्ससीन असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आवश्यकता भासल्यास 1 जूनपासून आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.

संघटनेचे गणेश नाखवा यांनी सांगितले की, राज्य शासनांतर्गत असलेल्या जलधी क्षेत्रात यंत्रचलित नौकांसाठी मासेमारी करण्यास बंदी घातलेली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. याउलट बहुतांश पर्ससीन नौकांवर अवैध मासेमारीच्या खोट्या आरोपाखाली कारवाई केली जाते. त्यात नौका जप्तीची किंवा दंडात्मक कारवाई करून नौका मालकांची पिळवणूक होत आहे. ट्रॉलर फिशिंग व गिलनेटधारकांवर मात्र अशी कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. तरी अवैध मासेमारी करणार्‍या सर्व प्रकारच्या नौकांवर कारवाई करताना दुजाभाव करू नये, म्हणून मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर व मत्स्य व्यवसाय आयुक्‍त यांना निवेदन देणार असल्याचे नाखवा यांनी स्पष्ट केले.

धक्कादायक बाब म्हणजे पारंपरिक मच्छीमारांच्या प्रतिनिधींना सामावून घेत आयुक्‍तांनी एका भरारी पथकाची निर्मिती केली असून महाराष्ट्र सागरी मासेमारी नियंत्रण कायद्यात अशी तरतूदच नसल्याचा गंभीर आरोप पर्ससीन मच्छीमारांच्या संघटनेने केला आहे. संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, पर्ससीन नौकांवर अंकुश ठेवण्यासाठी सुरू असलेल्या या बेकायदेशीर कृत्याबाबत आयुक्‍तांना भेटून जाब विचारण्यात येणार आहे.  कायदेशीर लढाई लढण्यात येईल. तसेच राज्याच्या जलधी क्षेत्राबाहेर मासेमारी करण्यासाठी जो कायदा तयार केला जात आहे, त्यात पर्ससीन संघटनेच्या प्रतिनिधींनाही सामावून घेण्यासाठी केंद्राला साकडे घालणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

राष्ट्रीय पातळीवर लढा उभारणार

गोवा, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू यांच्या राज्यस्तरीय समिती तयार करून पर्ससीन मच्छीमारांनी राष्ट्रीय संघटन उभे केले आहे. या संघटनाच्या माध्यमातून देशातील मत्स्य व्यवसायात पर्ससीन मच्छीमारांची असलेली गुंतवणूक आणि त्यातून निर्माण होणारा रोजगार व महसूल शासनाच्या निदर्शनास आणून दिला जाईल. तसेच पर्ससीन व्यवसायावर गदा आणण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय पातळीवर लढा देण्याचा निर्धार संघटनेने या बैठकीत व्यक्‍त केला.