Tue, Mar 26, 2019 21:54होमपेज › Konkan › कर्ली खाडीत रात्रीचे बेकायदेशीर वाळू उत्खनन

कर्ली खाडीत रात्रीचे बेकायदेशीर वाळू उत्खनन

Published On: Aug 22 2018 12:57AM | Last Updated: Aug 21 2018 10:48PMकुडाळ : प्रतिनिधी

कर्ली खाडी पात्रातील   कुडाळमधील कवठी, नेरूरपार, वेंगुर्लेमधील कोरजाई तर मालवणमधील आंबेरी भागात ‘रात का दिन’ करत अवैध वाळू उपसा सुरू आहे. एरवी ठोस कारवाईचा बडगा दाखविणारी ही यंत्रणा सुस्त का? अवैध वाळू उत्खनन करणारे व महसूल, खनिकर्म व पोलिस यंत्रणेमधील काही  अधिकारी, कर्मचारी याला कारणीभूत आहेत का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 

तत्कालीन सावंतवाडी प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी चार वर्षापूर्वी कर्लीखाडी पात्रात धाडसी कारवाई करून अवैध वाळू उत्खनन करणार्‍या व्यवसायिकांना मोठा धक्‍का दिला होता. त्यावेळी झालेल्या कारवाईने अवैध वाळू उत्खनन करणार्‍यांचे चांगलेच धाबे  दणादणले होते, मात्र त्यानंतर  अवैध वाळू उत्खननावर ठोस अशी  कारवाई करण्याची हिंमत प्रशासकीय यंत्रणेतील जबाबदार प्रमुख अधिकार्‍यांनी दाखविली नाही. पूर्वी सावंतवाडी व कणकवली असे दोन उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) होते, आता कुडाळ, मालवणसाठी स्वतंत्र प्रांताधिकारी आहेत, मात्र या वाळू उत्खनन करणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची हिंमत संबंधित प्रशासकीय यंत्रणा करताना दिसत नाही. परिणामी 31 मे नंतर वाळू उत्खनन बंद असतानाही काही लोकांनी बंदीच्या काळात वाळू उत्खनन कर्ली खाडीपात्रात सुरू केले आहे. शासनाचा लाखो  रूपयांचा महसूल या अवैध वाळू उत्खननात बुडविला जात  आहे.

सद्यस्थितीत कुडाळातील कवठी, नेरूरपार वेंगुर्लामध्ये कोरजाई तर मालवणमधील आंबेरीमध्ये खुलेआम रात्रीच्या वेळी वाळुचे उत्खनन सुरू आहे. मालवण महसूल पथकाने आपल्या हद्दीत कारवाई केली.मात्र ती केवळ औपचारिकता होती असे महसूलमधील प्रामाणिक अधिकारी कर्मचारी तसेच काही व्यवसायिकांमधून बोलले जात आहे. आता तर मालवण तहसीलदार समीर घारे यांनी वाळू व्यवसायिकांच्या घेतलेल्या बैठकीत अवैध वाळू उत्खननाबाबत वेंगुर्ले तहसीलदारांशी चर्चा करून संयुक्‍त कारवाई करू असे सांगितले आहे. मात्र ही संयुक्‍त कारवाई धडक कारवाई होणार की केवळ कारवाईचा फार्स? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सद्यस्थितीत कर्ली खाडीपात्रात चार ठिकाणी रात्रीच्या वेळी वाळू उत्खनन केले जाते. जेटीवर थेट डंपर लावून वाळू भरून ते गोव्याला पास केले जातात. ते रोखण्यासाठी महसूल व पोलिसाची भूमिका मोलाची ठरते. 

पोलिसांसमोरूनच वाळू वाहतूक?

कर्ली खाडीपात्रानजीक वेंगुर्ला कोरजाई गणपती मंदिर, येसुआका मंदिर व माऊली मंदिर याठिकाणी पोलिस विभागाचे चेकिंग पॉईंट आहेत. याठिकाणी रात्रीच्या वेळी ऑन ड्युटी असणारे पोलिस थंब लावण्याकरीता या पॉईंटवर जातात. विशेष म्हणजे कोरजाई गणपती मंदिर येथील पोलिसांचा हा चेकिंग पॉईंट जेटीच्या बाजुलाच आहे. त्याच ठिकाणाहून अवैध वाळू उत्खनन होवून पास केली जाते. तरीही पोलिस हे रोखण्यासाठी यशस्वी का होत नाहीत असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.