रत्नागिरी : प्रतिनिधी
जयगड खाडीवर पुन्हा एकदा वाळू माफियांनी हात-पाय पसरले असून करजुवे परिसरात बेकायदेशीरपणे सक्शनद्वारे राजरोस वाळू उपसा होत आहे. मात्र, महसूल विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांतून होत आहे.काही वर्षांपूर्वी डिंगणी येथे वाळू माफियांनी बेकायदा साम्राज्य उभे केले होते. त्यावेळी ‘पुढारी’ ने आवाज उठवल्यानंतर महसूल विभागाकडून हा वाळू व्यवसाय बंद करण्यास भाग पाडण्यात आले. आजपर्यंत या परिसरात बेकायदा वाळू व्यवसाय करण्यास कोणीही धजावलेला नाही. मात्र, नजीकच्या करजुवे गावामध्ये यावर्षी तीन सक्शन पंप लावण्यात आले आहेत. यातून दररोज सुमारे 150 ब्रासपेक्षा अधिक वाळू स्थानिक तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पोहोचवली जात आहे.
करजुवे गावामध्ये काही वर्षे वाळू व्यवसाय बिनबोभाटपणे सुरू आहे. मात्र, दरवर्षी हा व्यवसाय नवीन व्यक्ती सुरू करत आहे. शासनाने सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा करण्यावर बंदी घातलेली असूनही या भागामध्ये सुरू असलेल्या बेकायदा वाळू व्यवसायाला तेजी आली आहे. या भागातून माखजन किंवा डिंगणी मार्गे वाळू वाहतूक केली जाते. माखजनमार्गे कराडपर्यंत तर डिंगणी मार्गे कोल्हापूर, सांगलीपर्यंत ही वाळू पाठवली जात आहे.शासनाची मोठ्या प्रमाणात रॉयल्टी बुडत असताना महसूल विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. केवळ या तीन सक्शन पंपांद्वारे होणार्या वाळू उपशातून शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे.या वाळू माफियांनी डिंगणी मार्गावर बॅनर लावून वाळू विक्रीच्या जाहिराती केल्या आहेत. यातून या वाळू माफियांचे धाडस दिसून येत आहे. त्यामुळे वाळू माफियांवर वरदहस्त कोणाचा? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर महसूल विभागाने तत्काळ कारवाई करण्याची मागणीही होत आहे.
डिंगणी ग्रा.पं.च्या तक्रारीची दखल नाही.
बेकायदा वाळू उपशाबरोबरच रात्रीच्या वेळी ओव्हरलोड वाहतुकीने डिंगणी, करजुवे परिसरातील रस्ते उखडले आहेत. या भागात एकेरी रस्ता असून वाळू वाहतूक करणारी अवजड वाहने या मार्गावरून वेगाने हाकली जात आहेत. या मार्गावरून ये-जा करणार्या दुचाकी, रिक्षा आदी वाहनधारकांना या वेगवान गाड्यांमुळे जीव मुठीत धरून वाहने हाकावी लागत आहेत. या वाहतुकीबाबत डिंगणी ग्रामपंचायतीने तक्रारही केली आहे. मात्र, याची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही.
Tags : Konkan, Illegal, sand, extraction, suction, wings, Karjouve area