Fri, Jul 19, 2019 05:23होमपेज › Konkan › अवैध वाळू वाहतूक; 10 डंपर ताब्यात

अवैध वाळू वाहतूक; 10 डंपर ताब्यात

Published On: Feb 19 2018 1:22AM | Last Updated: Feb 18 2018 9:08PM कुडाळ : शहर वार्ताहर

विनापरवाना व ओव्हरलोड वाळू, खडीच्या अवैध वाहतुकीविरोधात कुडाळ तहसीलदार कुमार आशीर्वाद यांनी रविवारी पहाटेपासून पोलिस बंदोबस्तात मोहीम राबविली. या मोहिमेत वाळू  व खडी वाहतूक करणार्‍या  सुमारे 100 हून अधिक डंपरची वजन काट्यावर तपासणी करण्यात आली. पैकी अवैध वाळू वाहतूक करणारे 10 डंपर महसूल यंत्रणेने ताब्यात घेतले.  अचानक राबविलेल्या या कारवाईने वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

कुडाळ तहसीलदारपदी आशीर्वाद नव्याने रूजू झाले आहेत. रविवारी सकाळी त्यांनी तालुक्यातील सरंबळी-सोनवडे, नेरूर, दुर्गावाड, नेरूर-जकातनाका, वालावल, चेंदवण, कवठी, नेरूरपार, पाट-माड्याचीवाडी, पिंगुळी म्हापसेकर तिठा, झाराप बायपास नाका आदी वाळू वाहतूक होणार्‍या मार्गावर पथके नियुक्‍त करून डंपर तपासणीस सुरुवात केली. या मोहिमेदरम्यान  100 ते 125 वाळू व खडी वाहतूक डंपरची एमआयडीसी व आकेरी येथील वजन काट्यांवर तपासणी करण्यात आली. नियमात असणार्‍या डंपरना तपासणीनंतर सोडण्यात आले. 

आ. वैभव नाईक यांनीही तहसीलदार आशीर्वाद यांच्याशी या कारवाईबाबत चर्चा केली. वाळू व्यावसायिक व डंपर मालकांनीही तहसीलदारांशी  चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तहसीलदार आपल्या भूमिकेशी ठाम राहिल्याने झाराप व एमआयडीसी येथे व्यावसायिक व तहसीलदार यांच्यात शाब्दिक वाद झाले. या कारवाईत महसूल पथकाने डंपर थांबविताच सर्व कागदपत्रे व चालकाकडील मोबाईल जप्त करीत तपासणीनंतर ते देण्यात आले.