Wed, Apr 24, 2019 21:30होमपेज › Konkan › सह्याद्रीचा पट्टा बनतोय अवैध वृक्षतोडीचे केंद्र

सह्याद्रीचा पट्टा बनतोय अवैध वृक्षतोडीचे केंद्र

Published On: Feb 19 2018 1:22AM | Last Updated: Feb 18 2018 8:12PMसावंतवाडी : दत्तप्रसाद पोकळे

तालुक्यातील सह्याद्रीचा पट्टा सध्या अवैध वृक्षतोडीचे केंद्र बनला आहे. वनविभागाच्या छुप्या पाठबळाच्या जोरावर लाकूड माफिया सहयाद्री परिसरातील गावात लागू असलेले हायकोर्टाचे वृक्षतोड बंदी आदेश व इको सेन्सिटिव्ह झोनचे निर्बंध धाब्यावर बसवून बेसुमार वृक्षतोड करीत असल्याने सह्याद्री पट्ट्यातील बरीचशी जंगले उजाड होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या दोडामार्ग तालुक्यातून तांबोळी, भालावल, बावळाट, दाणोली, आंबोलीमार्गे कर्नाटक पासिंगच्या ट्रकमधून राजरोसपणे होणारी लाकूड वाहतूक चर्चेचा विषय बनली आहे. आंबोली वन तपासणी नाक्यावर या ट्रकना कोणतीच आडकाठी केली जात नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

 जिल्ह्यातील सर्वाधिक वनसंपदा सावंतवाडी तालुक्यात आहे. तालुक्याचा मोठा भाग खाजगी तसेच राखीव वनांनी व्यापला असून सहयाद्री पट्टयात अजूनही जैवसमृद्ध जंगले शाबूत आहेत. आंबोली ते दोडामार्गातील मांगेलीचा पट्टा सहयाद्री वन्यजीव कॉरिडॉरचा भाग म्हणून गणला जातो. वनविभागाचे विभागीय कार्यालयही या सर्व पार्श्‍वभूमीवर सावंतवाडीतच आहे. मात्र, याच तालुक्यात होणारी वृक्षतोड थांबविण्यात वनविभाग असमर्थ ठरत आहे. एरव्ही आंबोली घाटमार्गातील अतिक्रमण असो किंवा वनक्षेत्राशी संबंधित इतर विषयांवर आक्रमक होणारा वनविभाग वृक्षतोडीबाबत मूग गिळून गप्प का बसतो हा संशोधनाचा विषय ठरत आहे.

गेल्या काही वषार्ंपासून सावंतवाडी तालुक्याच्या काही भागात वृक्षतोड बंदी लागू आहे. आवाज फाऊंडेशनच्या याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने तालुक्यातील काही गावात वृक्षतोड बंदी घातली होती.तर दोडामार्ग तालुक्यात पूर्णपणे बंदी आदेश लागू केले होते. नंतर पर्यावरण मंत्रालयाने सावंतवाडी तालुक्यातील 52 गावे इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर केल्याने या गावातही वृक्षतोड बंदीचे निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, या सर्व आदेशानंतरही वृक्षतोड सुरूच राहिली. खासगी क्षेत्रातील वृक्षतोड थांबविण्याचा अधिकार आपल्यास नाही, असे गोंडस कारण देत वनविभाग याकडे दुर्लक्ष करत होता. मात्र, या विषयावर सुनावणी करताना राष्ट्रीय हरित लवादाने अशी वृक्षतोड थांबविण्यासाठी वन व महसूल विभागास संयुक्‍त कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, त्याकडेही वनविभागाने दुर्लक्ष केल्याने तालुक्याचा सहयाद्रीचा मोठा पट्टा बेकायदेशीर वृक्षतोडीचे केंद्र बनला 
आहे.

सध्या दोडामार्ग तालुक्यातून तांबोळी, भालावल, बावळाट, दाणोली, आंबोलीमार्गे कर्नाटक पासिंगच्या ट्रकमधून राजरोसपणे लाकडांची वाहतूक होत आहे. हे सर्व लाकूड बेळगावच्या दिशेने जात असल्याचे बोलले जाते.मात्र या लाकूड वाहतुकीवर आंबोली वन तपासणी नाक्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.