Mon, Mar 25, 2019 05:07
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › मोडकाआगर धरणाच्या गळतीकडे दुर्लक्ष

मोडकाआगर धरणाच्या गळतीकडे दुर्लक्ष

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 04 2018 8:54PMशृंगारतळी : वार्ताहर

गेल्या अनेक वर्षांपासून मोडकाआगर धरणाच्या पश्‍चिमेकडच्या बांधातून गळती होत असल्याच्या अनेक तक्रारी लघु पाटबंधारे विभागाकडे दाखल झाल्या. मात्र, ही गळती थांबविण्यासाठी प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे गुहागर तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करणार्‍या या धरणातून होणार्‍या गळतीकडे शासनासह लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गुहागर तालुक्यातील मोडकाआगर या धरणाचे पाणलोट क्षेत्र 11.65 चौरस किलोमीटर असून उंची तब्बल 20 मीटर आहे. या अवाढव्य धरणाची साठवण क्षमता 44.70 लाख घनमीटर आहे. मूळतः सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी या धरणाची निर्मिती केली गेली. परंतु, कालांतराने शेती, भाजीपाला व बागायतीसाठी कालव्याने पाणीपुरवठा करण्याची पद्धत बंद झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या धरणाच्या मुबलक पाणीसाठ्यावर सुरूवातीला तालुक्याचे ठिकाण असलेल्या गुहागर व शेजारच्या असगोली ग्रामपंचायतीने संबंधित खात्याची पूर्वपरवानगी घेऊन धरणाच्या शेजारी विहिरी पाडून त्यावर स्वतंत्र पंप बसवून नळपाणी योजना सुरू केली.

त्यानंतर शेजारच्या पाटपन्हाळे, पालशेत व आरे गावांनीही आपापली पाणी योजना व धरणाच्या बाजूला विहीर उभारून सुरू केली. सध्या गुहागर तालुक्यातील अनेक मोठ्या गावांना पाणीटंचाईची झळ बसली आहे त्या गावांना या धरणाच्या पाण्यातून पाणीपुरवठा केला जात आहे. सुमारे 60 च्या दशकात बांधलेल्या या धरणाच्या उभारणीपासून आजयागायत डागडुजी व दुरूस्तीकरिता कोणताही शासकीय निधी खर्ची पडला नव्हता.

परंतु, सन 2010-2011 मध्ये धरणाच्या भिंतीमधून लागलेली गळती बंद करण्यासाठी राज्य शासनाने जलसुधारणा प्रकल्पांतर्गत जागतिक बँकेकडून प्राप्त झालेल्या 95 लाखांचा भरीव निधी या ठिकाणी खर्ची टाकला. मात्र, एवढा निधी खर्च करूनही धरणातील ही गळती बंद करण्यास अपयश आले असून सध्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही या गळतीकडे दुर्लक्ष करीत असून गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे.