Sat, Aug 24, 2019 23:15होमपेज › Konkan › आंबोलीतील सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्षच!

आंबोलीतील सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्षच!

Published On: Aug 02 2018 1:59AM | Last Updated: Aug 01 2018 11:23PMआंबोली : निर्णय राऊत

गतवर्षी सोमवार, 31 जुलै 2017 रोजी दुपारी आंबोली कावळेशेत पॉईंट येथे गडहिंग्लज येथील दोन पर्यटकांचा सुमारे 800 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला. याची चित्रफीत व्हायरल झाल्याने सर्व प्रकरण बाहेर आले होते. या घटनेला एक वर्ष  पूर्ण झाले. मात्र, या ठिकाणी भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

31 जुलै 2017 रोजी सोमवारी गडहिंग्लज येथील पोल्ट्री फार्ममध्ये काम करणारा 7 जणांचा ग्रुप कावळेशेत पॉईंट येथे आला होता. ते सर्व जण दारूच्या नशेत मौजमजा करत होते. त्यातील प्रताप राठोड व इम्रान गारदी हे दोन तरुण दारूच्या नशेत अतिउत्साहीपणात संरक्षण कठडा ओलांडत स्टंटबाजी करताना थेट सुमारे 2 हजार फूट खोल दरीत कोसळले. ही घटना घडत असतानाचे चित्रीकरण तेथे उपस्थितीत काही पर्यटकांनी केले होते. याच चित्रीकरणामुळे ही सत्य परिस्थिती समोर आली होती.

यानंतर प्रताप व इम्रान यांचे मृतदेह बाहेर काढण्यास रेस्क्यू पथकांना अनेक समस्या येत होत्या. जोरदार पाऊस व धुके यामुळे रेस्क्यू मोहिमेला वेळ लागला. रेस्क्यू मोहिमत सहभागी असलेल्या कोल्हापूर येथील पथकातील दोन सदस्य दरीत अडकल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. त्यानंतर घटनेच्या पाचव्या दिवशी एकाचा तर सहाव्या दिवशी दुसरा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या रेस्क्यू मोहिमेत आंबोली आपत्कालीन, सांगेली आपत्कालीन, कोल्हापूर व शिवदुर्ग लोणावळा येथील पथकांनी सहभाग घेतला होता.

या दुर्घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती. या दुर्घटनेला  आज एक वर्ष पूर्ण झाले तरीही याठिकाणी सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना प्रशासनाने केलेली नाही. कावळेशेत पॉईंट येथे पावसाळ्यात असंख्य पर्यटक भेट देतात. येथे पर्यटकांच्या संरक्षणासाठी असलेले रेलिंग अर्धवट तसेच मध्ये-मध्ये तुटलेले आहे. दरीत कोसळून ठार झालेल्या तरुणांनंतर गडहिंग्लज येथील शिक्षकाचा खून करुन टाकलेला मृतदेह  तसेच  एका युवतीचा व युवकाचा मृतदेह याच कावळेशेत दरीतून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर पोलिस प्रशासनाकडून तात्पुरते चेकपोस्ट गेळे-कावळेशेत फाट्यावर उभारण्यात आले.

मात्र, ते वादाच्या भोवर्‍यात अडकल्याने ते हटवण्यात आले. त्यानंतर ते अद्याप परिस्थिति जैसे थे च!  कावळेशेत पॉईंट येथे कायमस्वरूपी गेट बसवून रात्रीच्या वेळी कावळेशेत पॉईंटवर जाण्यास बंदी घालावी. कावळेशेत पॉईंटवरील रेलिंगची उंची वाढवावी, दरीच्या बाजूने अर्धवट असलेले रेलिंग पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. तसेच पावसाळ्यात पोलिस बंदोबस्त ठेवण्याची  गरज आहे. गतवर्षी च्या 31 जुलैच्या घटनेनंतर या पर्यटनस्थळाला सुसाईड पॉईंट असे आता संबोधले जात आहे! याचा फटकाही येथील पर्यटनावर बसत आहे. प्रशासनाने येथे उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.