Thu, Jul 18, 2019 14:25होमपेज › Konkan › जनमत चाचणी घेतल्यास ‘नाणार प्रकल्प’ विरोध स्पष्ट होईल : डॉ. परुळेकर

जनमत चाचणी घेतल्यास ‘नाणार प्रकल्प’ विरोध स्पष्ट होईल : डॉ. परुळेकर

Published On: May 11 2018 1:38AM | Last Updated: May 10 2018 11:09PMसावंतवाडी : प्रतिनिधी

नाणार येथे होणारा ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा भविष्यात धोक्याची घंटा आहे. त्यामुळे आणखी काही दिवसांनी या ठिकाणी कॅन्सरचे रुग्ण वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे हा प्रकल्प हवा की नको यासाठी जनमत चाचणी घ्यावी म्हणजे प्रदूषणकारी प्रकल्पाला होणारा विरोध स्पष्ट होईल,असे मत कॉग्रेसचे जिल्हा प्रवक्‍ते डॉ. जयेंद्र  परुळेकर यांनी व्यक्‍त केले.शिवसेनेत असताना संपूर्ण कोकण इकोसेन्सिटीव्ह करण्याची मागणी करणारे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकल्पाबाबत भूमिका स्पष्ट करावी,असे आव्हानही श्री.परुळेकर यांनी दिले. 

सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर, आनंद परुळेकर उपस्थित होते.श्री.परुळेकर म्हणाले,ग्रीन रिफायनरी प्रकल्पावरुन संपूर्ण महाराष्ट्रात राजकारण पेटले आहे.कोकणच्या  मुळावर  घाला घालणारा हा प्रदूषणकारी प्रकल्प असून यात 6कोटी 2 लाख टन क्रूड ऑईलचे  शुद्धीकरण होणार आहे.त्याचबरोबर प्रतिदिन कोट्यवधी समुद्राचे पाणी नि:क्षारीकरण होणार असल्याचे त्यांनी सांगून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यावरही टीका केली.

या प्रकल्पाला काँग्रेसचा तीव्र विरोध असल्याचे सांगतानाच तब्बल चारवेळा कोकणी जनतेने प्रभू यांना खासदार म्हणून निवडून दिले आहे. सन 2009 निवडणुकीच्या काळात प्रभू यांनी कोकण हा प्रदेश पर्यटनदृष्टया विकसीत असून याठिकाणी इकोसेन्सिटीव्ह लागणे गरजेचे आहे असे वारंवार बोलून दाखविले होते. मात्र, आज या ठिकाणी नाणार सारखा प्रदूषणकारी प्रकल्प येत आहे. याचा फटका जिल्ह्यातील लोकांना सहन करावा लागणार आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता हा प्रकल्प रद्द करण्यात यावा,अशी मागणी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील लोकांकडून होत आहे. त्यामुळे याचा विचार लक्षात घेता हा प्रकल्प रद्द होण्यासाठी प्रभू यांनी प्रयत्न करावेत असे श्री.परुळेकर म्हणाले.

हा प्रकल्प या भागासाठी फायदेशीर आहे का नाही याबाबत लोकप्रतिनिधींनी निर्णय न घेता दोन्ही जिल्ह्यातील लोकांची जनमत चाचणी घ्यावी आणि त्यानंतर हा प्रकल्प करण्याबाबत पावले उचलण्यात यावीत असेही परुळेकर म्हणाले.