Fri, Apr 19, 2019 12:19होमपेज › Konkan › मराठा आरक्षण न दिल्यास राज्य सरकारला फटका : खा. राणे

मराठा आरक्षण न दिल्यास राज्य सरकारला फटका : खा. राणे

Published On: Sep 01 2018 1:46AM | Last Updated: Aug 31 2018 11:46PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाचा विषय हा पुढे पुढे ढकलून चालणार नाही. खरे म्हणजे महाराष्ट्र शासन न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करू शकते, तशी या शासनाची क्षमताही आहे. त्यामुळे त्यांनी ते लवकर करावे, आचारसंहिता लागण्याची वाट पाहू नये; अन्यथा या निवडणुकीत याचा फटका बसेल, असा इशारा माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी दिला.

पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खा. नारायण राणे बोलत होते. यावेळी आ. नितेश राणे, डॉ. मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते.मराठा आरक्षणाबाबत नारायण राणे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, मराठा आरक्षण हा विषय पुढे पुढे ढकलून चालणार नाही. खरे म्हणजे महाराष्ट्र शासनाने न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करून हा विषय मार्गी लावणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी  डिसेंबर, जानेवारी असे करत राहण्याची आवश्यकता नाही. प्रतिज्ञापत्र सादर करण्याची क्षमता या सरकारमध्ये आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या अगोदर हे प्रतिज्ञापत्र शासनाने न्यायालयात सादर करावे, अन्यथा निवडणुकांमध्ये त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला.

महामार्गाच्या स्थितीबाबत ते म्हणाले, महामार्ग गणेशोत्वाच्या अगोदर व्यवस्थित व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच बांधकाममंत्री  चंद्रकांत पाटील यांना लेखी पत्र दिले आहे. महामार्गाची दुरवस्था होण्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित ठेकेदाराची आहे. ठेकेदाराने लक्ष न दिल्याने ही स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे असा ठेकेदार असू नये, असे आपले मत आहे. जिल्ह्यात मंत्री चंद्रकांत पाटील येत आहेत, त्यांची कणकवली येथे आपण भेट घेणार आहोत. त्यावेळीही या स्थितीबाबत आपलं मत मांडणार, असेही राणे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

12 सप्टेंबर रोजी चिपी विमानतळावर विमानाचे ट्रायल होणार आहे. त्या ठिकाणी आवश्यक त्या प्राथमिक सुविधा तयार करणे ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी आहे. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्याला 12 सप्टेंबर रोजी तिथे उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे मी त्या दिवशी तिथे उपस्थित राहणार, असेही खा. राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

पृथ्वीराज चव्हाणांमुळेच काँग्रेसला फटका

काँग्रेसने सुरू केलेल्या जनसंघर्ष यात्रेबाबत नारायण राणे म्हणाले, काँग्रेसने काहीच केलं नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भरीव असे काम न केल्यानेच काँग्रेसला त्याचा फटका बसला. त्यामुळे त्यांची सत्ता गेली. आता काँग्रेसमध्ये राहिले  काय आहे की ज्याने परत सत्ता येईल. त्यांनी काहीच केलं नाही. त्यामुळे जनता पुन्हा काँग्रेसला सत्ता देईल या भ्रमात त्यांनी राहू नये, असा सल्ला दिला.