Wed, Jun 26, 2019 17:27होमपेज › Konkan › WC2019 : भारताची सलामी द. आफ्रिकेशी

WC2019 : भारताची सलामी द. आफ्रिकेशी

Published On: Apr 24 2018 11:17PM | Last Updated: Apr 24 2018 11:17PMकोलकाता : वृत्तसंंस्था

इंग्लंडमध्ये होणार्‍या 2019 क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाला आज (मंगळवार) अंतिम स्वरूप देण्यात आले. 30 मे ते 13 जुलै या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार असून 4 जून रोजी हा सामना खेळवला जाणार आहे. कोलकात्यात पार पडलेल्या आयसीसीच्या बैठकीत यासंदर्भात घोषणा करण्यात आली. स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक 30 एप्रिलपर्यंत जाहीर केले जाणार आहे.

ठरलेल्या वेळापत्रकानुसार, 2019 च्या विश्‍वचषकात भारत आपला पहिला सामना 2 जून रोजी खेळणे अपेक्षित होते; मात्र लोढा समितीने दिलेल्या शिफारसीनुसार, आयपीएलची स्पर्धा व कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 15 दिवसांचा खंड असणे गरजेचे आहे. 2019 साली आयपीएल स्पर्धा 29 मार्च ते 19 मे या कालावधीत खेळवली जाणार आहे, अशी बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने वृत्तसंस्थेला माहिती दिली. 

वेळापत्रक निश्‍चितीशिवाय पाच वर्षांच्या भविष्यकालीन दौरा कार्यक्रमाला (एफटीपी) मंजुरी देण्यात आली. यानुसार भारत आगामी पाच वर्षांत 309 दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. गेल्या पाच वर्षांपेक्षा 92 दिवस कमी कालावधीचा हा कार्यक्रम आहे. दोन मालिकांमध्ये पुरेसे अंतर असावे, या विराट कोहलीच्या मागणीची दखल घेऊन हा बदल करण्यात आला असल्याचे समजते.