Mon, Aug 19, 2019 18:36होमपेज › Konkan › शिकार करणारे १३ जण वन विभागाच्या जाळ्यात

शिकार करणारे १३ जण वन विभागाच्या जाळ्यात

Published On: Jun 09 2018 1:35AM | Last Updated: Jun 08 2018 10:29PMखेड : प्रतिनिधी

मंडणगड तालुक्याच्या जंगलमय भागात शिकार करण्यास गेलेल्या 13 जणांच्या टोळक्याला वन विभागाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून एक पीकअप गाडी, दोन बंदुका, चार काडतुसे व अन्य मुद्देमाल जप्‍त केला असून, एक मृत ससादेखील ताब्यात घेतला आहे. वन विभागाने बेकायदा शिकार करणार्‍यांच्या विरोधात जोरदार मोहीम राबविली आहे. तालुक्यात बेकायदेशीर शिकार सुरू असल्याची माहिती दापोलीचे परिक्षेत्र वनाधिकारी सुरेश वरक यांना मिळाली. त्यांनी याबाबत चिपळूणचे विभागीय वनाधिकारी यांना माहिती दिली. यानंतर विजयराज सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित निमकर, एम. जी. पाटील, एल. के. जांभळे, डी. आर. भोसले, संतोष परशेट्ये, सिद्धेश्‍वर गायकवाड यांनी मंडणगड येथे धाव घेतली. 

गुरुवारी रात्री मंडणगड येथील जंगलात गस्ती घालत असताना त्यांना एक गाडी शिकार करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे आढळून आले. त्यानंतर ही गाडी वनविभागाच्या अधिकार्‍यांनी थांबवली व गाडीतील 13 जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर सर्व मुद्देमालासहीत या टोळक्याला दापोली येथे आणण्यात आले. यामध्ये सौरभ लाड (29), संदेश महाडिक (32), अनिल बेडेकर (26), रणजित बेडेकर (24), अमित पवार (26), योगेश सावंत (29), विनय नगरकर (29), अमित आंबवले (30), प्रवीण गायकवाड (32), नीलेश मोटे (44), रवींद्र जाधव (32), अविनाश भोसले (28), अशोक आंबवले  (सर्व रा. मंडणगड)आदी युवकांचा समावेश आहे.

त्यांच्याकडून पीकअप गाडीसह बंदुका, काडतुसे, दोन बॅटर्‍या व मृत ससा जप्‍त करण्यात आला आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत या 13 जणांवर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे.