होमपेज › Konkan › सावंतवाडीत मागासवर्गीय मुलांसाठी वसतिगृह

सावंतवाडीत मागासवर्गीय मुलांसाठी वसतिगृह

Published On: Aug 14 2018 1:08AM | Last Updated: Aug 13 2018 10:01PMसावंतवाडी : प्रतिनिधी

सावंतवाडीतील मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह  स्वतंत्र जागेत उभारले जाणार असून त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम लवकरच करण्याची ग्वाही  पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्‍नती मंडळाच्या सावंतवाडी तालुका समितीच्या गुणगौरव व स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.व्यासपीठावर जिल्हा सरचिटणीस सुयोग धामापुरकर, तालुकाध्यक्ष लवू चव्हाण, उपाध्यक्ष सदानंद चव्हाण, सचिव भारत बांदेकर, नायब तहसीलदार प्रदीप पवार, माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अनिल निरवडेकर,  आदी उपस्थित होते. यावेळी ना. केसरकर यांनी शहरात सुरू होणार्‍या युपीएससी  एचआरडी सेंटरमध्ये चर्मकार समाजाच्या  पाच मुलांना खास शिष्यवृत्ती उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली.

प्रशासनात मोठे अधिकारी व्हावे यासाठी आपला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. आदर्श जिल्हा बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.शहरात डाटा सेंटरमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रस्तावित स्टिमकास्ट या कंपनीद्वारे पाच हजार कोटी रुपयांची आयटीत  गुंतवणूक केली जाणार आहे. याचे प्रशिक्षण केंद्र सावंतवाडीत सुरू होणार आहे. यातून पाचशे महिलांना रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे. रोजगाराच्या योजना तळागाळापर्यत पोहोचविल्या पाहिजे. 

सावंतवाडी ही  सुवर्णभूमी बनविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. सत्कारापेक्षा अनेक हातांना काम मिळाल्यास  आपला सत्कार हा सत्कारणी लागेल, असेही ते म्हणाले. त्यांच्या हस्ते चर्मकार समाज ज्ञाती गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच सेवानिवृत्त झालेल्या ज्ञाती बांधवांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर म्हणाले, सध्या आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. आपल्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी सर्व 52 समाजाच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ मंत्रालयात मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी जाणार असून ही भेट येत्या पंधरा दिवसांत घेणार असल्याचे सांगितले.