होमपेज › Konkan › कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या आशा पल्लवित

कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या आशा पल्लवित

Published On: May 12 2018 1:29AM | Last Updated: May 11 2018 9:12PMरत्नागिरी : शहर वार्ताहर

कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समिती पदाधिकार्‍यांची कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता व अधिकार्‍यांच्यासह 9 एप्रिल रोजी बेलापूर येथे बैठक झाली. विविध मागण्यांसाठी दि. 23 एप्रिल रोजी रेल रोको आंदोलनाचा इशारा कृती समितीने दिला होता. या पार्श्‍वभूमीवर सुवर्णमध्य काढण्याच्या हेतूने ही बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याने प्रकल्पग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

या बैठकीमध्ये मागण्यांबाबत उहापोह करून याबाबत निर्णय द्यावा, अशी मागणी समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण, सल्लागार उमेश गाळवणकर व अन्य पदाधिकारी यांनी केली होती.  परंतु, निर्णय आम्हाला घेता येत नाही असे बैठकीला उपस्थित असलेल्या कोकण रेल्वेचे अधिकार्‍यांनी सांगून बैठक निर्णायक होण्यासाठी दि.9 मे रोजी कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्यासमवेत सकाळी 11 वाजता बेलापूर मुख्य कार्यालयात बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्याकडून अनेक मुद्यांवर चर्चा करताना एक सकारात्मक भूमिका आढळून आल्याने भविष्यात कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांना कोकण रेल्वे मध्ये सामावून घेण्याबाबत एक आशेचा किरण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यावेळी 12/2 च्या नोटिशीनुसार ज्या प्रकल्पग्रस्तांना कोकण रेल्वे प्रकल्पासाठी जमीन संपादित केल्याच्या मोबदल्यात रक्कम मिळाली अशांना प्रकल्पग्रस्त म्हणून मान्यता मिळून त्यानुसार प्रकल्पग्रस्त म्हणून स्वतंत्ररित्या दाखला देण्यात यावा व हा त्या कुटुंबाला पुढच्या पिढीपर्यंत ग्राह्य धरण्यात यावा. या मागणीवर योग्य तो अभ्यास करून लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाने सांगितले. 

ज्या उमेदवारांनी कोकण रेल्वेने जाहीर केलेल्या विविध अधिसूचनेनुसार रितसर अर्ज करून रेल्वेच्या छाननी प्रक्रियेनंतर घेतलेल्या लेखी परीक्षेनुसार पात्र उमेदवारांच्या याद्या तयार करण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्या विविध चाचण्या घेऊन काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना सेवेत सामावून घेतले गेले नाही अशांच्या तांत्रिक अडचणी दूर करून घेऊन त्यांना विना अट सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. कृती समितीच्या 201 उमेदवारांच्या यादीची उमेदवारनिहाय कागदपत्रांची योग्य ती छाननी करून तयाबाबतचा अभिप्राय लवकरात लवकर किंवा 2 महिन्यामध्ये उपलब्ध करून दिला जाईल, असे गुप्ता यांनी सांगितले.

कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांसाठी त्या-त्या पदाकरीता शैक्षणिक पात्रता व शारीरिक क्षमतेनुसार कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून प्रथम त्याला प्रोबेशनवर नियुक्त करून घ्यावे व त्यानंतर त्याला कायम करून घेण्यात यावे. समितीच्या या मागणीवर विचार करता येणार नाही, असे गुप्ता यांनी सांगितले. नोकर भरतीकरिता प्रत्येक उमेदवाराला सर्व त्या स्पर्धात्मक परीक्षा द्याव्या लागतात. सरकारी कार्यालयामधील सर्व नोकर भरतीसाठी लागू असलेली प्रचलित पद्धती आहे, असे सांगण्यात आले. 

प्रकल्पग्रस्तांतून उमेदवार यादी संपल्यानंतर रेल्वेकडे जागा रिक्त राहिल्यास कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे ज्या भागातून जाते त्या भागातील उमेदवारांना संधी द्यावी. त्यास समितीचा विरोध असणार नाही. या मुद्यावर कोकण रेल्वे अधिकार्‍यांचे नोकर भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्याबाबतचे धोरण असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रकल्पग्रस्त उमेदवारांमधून उमेदवार पूर्ण झाल्यानंतरच इतर उमेदवारांचा विचार केला जातो, असे  सांगितले. असि. लोको पायलट, स्टेशन मास्टर्स, पॉईंट्समन, ट्रॅकमन इत्यादी सुरक्षाविषयक पदे भरण्यासाठी जास्त काळ विलंब ठेवता येत नाही. किंबहुना पात्रता निकष शिथिल करता येत नाहीत, असे गुप्ता यांनी सांगितले.

प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरीच्या प्रयत्नात 10-10, 20-20 वर्षे धडपड करीत असलेल्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेताना वयाची अट शिथिल करण्यात यावी. प्रकल्पग्रस्त नोकरीच्या प्रतिक्षेत राहून त्याची निर्धारित वयोमर्यादा उलटून गेलेली आहे. तरी अशा उमेदवारांसाठी वयोमर्यादा 45 करणेत यावी जेणेकरून त्याची नियुक्ती झाल्यास किमान 13 वर्षे सेवा होईल. कोकण रेल्वे प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांची वयाची अट शिथिल करणे कोणत्याही परिस्थितीत जमणार नाही असे स्पष्ट केले आहे.  या बैठकीला कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समिती पदाधिकारी, उपस्थित होते.