Wed, Apr 24, 2019 07:52होमपेज › Konkan › देऊड-चिंचवाडीत सुरुंगामुळे घरांना तडे

देऊड-चिंचवाडीत सुरुंगामुळे घरांना तडे

Published On: Feb 12 2018 1:58AM | Last Updated: Feb 11 2018 9:33PMरत्नागिरी : प्रतिनिधी

बहुचर्चित जयगड-डिंगणी रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले आहे. तालुक्यातील देऊड येथील बोगद्यासाठी लावण्यात आलेल्या सुरुंगामुळे चिंचवाडीतील दहा ते बारा घरांना तडे गेल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

जयगड-डिंगणी रेल्वे मार्गावर देऊड येथून बोगदा काढण्यात येत आहे. यापूर्वीही मोठ्या क्षमतेचे सुरुंग स्फोट करण्यात आले होते. त्यावेळी देऊड-घाणेकरवाडी व चिंचवाडीमध्ये घरांना धक्के बसले होते. यानंतर ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात संताप निर्माण होईल म्हणून पोलिसांनी ग्रामस्थांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. परिणामी अधिक शक्‍तिशाली सुरुंग लावण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा फटका चिंचवाडीतील दहा ते बारा घरांना बसला आहे.
जयगड-डिंगणी रेल्वे मार्ग अनेक ग्रामस्थांच्या मुळावर आला आहे. या प्रकल्पाविरोधात आवाज उठवणार्‍यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

या रेल्वे मार्गासाठी करण्यात आलेल्या करारामध्ये नमूद केलेल्या सुविधांबाबतही जयगड-डिंगणी रेल्वेमार्गाचे विकासक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही आता उघडपणे होऊ लागला आहे. या गळचेपी विरोधात आवाज उठवण्याचा निर्धार आता ग्रामस्थ करत आहेत. त्यांच्या आंदोलनाची दिशा लवकरच स्पष्ट होईल, असे सांगण्यात येतआहे.

शक्‍तिशाली सुरुंगांवर नियंत्रण नाही...?

रेल्वे मार्गाच्या बोगद्यांसाठी लावण्यात येत असलेले सुरुंग हे शक्‍तिशाली असून यावर जिल्हा प्रशासन अथवा पोलिसांचे नियंत्रण आहे की नाही? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या शक्‍तिशाली सुरुंगांमुळे घरांचे होत असलेले नुकसान भरून कोण देणार? त्याचबरोबर ही घरेही ढासळणार आहेत. ती कधीही पडून दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे.