Fri, Nov 16, 2018 15:48होमपेज › Konkan › कीर्तनसंध्येत उलगडणार स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास

कीर्तनसंध्येत उलगडणार स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास

Published On: Dec 16 2017 1:44AM | Last Updated: Dec 15 2017 8:47PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरीत यावर्षीच्या कीर्तनसंध्या महोत्सवात 1857 पासून 1920 पर्यंतचा ऐतिहासिक कालखंड राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळेबुवा उलगडणार आहेत. कीर्तनसंध्या परिवारातर्फे पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. येत्या 3 ते 7 जानेवारी 2018 या काळात हा महोत्सव होणार आहे.

रत्नागिरीत सुरू असलेल्या कीर्तनसंध्या उपक्रमाचे यंदाचे सातवे वर्ष आहे. रत्नागिरीच्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलात 3 ते 7 जानेवारी या कालावधीत दररोज सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत ही कीर्तने होणार आहेत. गेल्या सात वर्षांत संभाजी महाराज, शिवाजी महाराज, सुभाषचंद्र बोस, पेशवाईतील मराठशाहीची देशव्यापी झुंज, स्वराज्याकडून साम्राज्याकडे, 1857 चे स्वातंत्र्ययुद्ध या विषयांवर कीर्तने झाली. यावर्षी क्रांतीपर्वाचा दुसरा भाग म्हणजेच 1857 ते 1920 या कालखंडातील इतिहास कीर्तनाद्वारे मांडला जाणार आहे.

कीर्तनाच्या पूर्वरंगात लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या गीतारहस्यावरचे विवेचन आफळेबुवा करणार आहेत. उत्तररंगात 1857 ते 1920 या कालावधीतील लोकमान्य टिळक, चापेकर बंधू, महात्मा फुले, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, मदनलाल धिंग्रा, बिपीनचंद्र पाल, खुदीराम बोस, फडके, बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी कार्याचा आलेख मांडला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी इतिहासाच्या शिक्षणाची ही पर्वणी आहे, असे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे. महोत्सवात हेरंब जोगळेकर (तबला), मधुसूदन लेले (हार्मोनियम), राजा केळकर (पखवाज), उदय गोखले (व्हायोलिन), उदयराज सावंत (ध्वनीव्यवस्था) यांची साथसंगत लाभणार आहे.

चारुदत्तबुवा आफळे यांचे वडील गोविंदबुवा आफळे यांच्या शताब्दीच्या निमित्ताने एक संकेतस्थळ सुरू करण्यात येणार असून त्याचा प्रारंभ कीर्तनसंध्या महोत्सवात होईल. महोत्सवाच्या देणगी सन्मानिका अवधूत जोशी, नितीन नाफड, उमेश आंबर्डेकर, गौरांग आगाशे यांच्याकडे उपलब्ध होणार आहेत.