Thu, Apr 25, 2019 05:26होमपेज › Konkan › ऐतिहासिक ‘रांगणागड’ अडकला समस्यांच्या वेढ्यात

ऐतिहासिक रांगणागड अडकला समस्यांच्या वेढ्यात

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 21 2018 9:59PMहिर्लोक : संतोष तांबे

 कुडाळ तालुक्यातील नारूर गावापासून काही अंतरावर सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्याच्या  सीमेवर इतिहासाची साक्ष देत उभ्या असलेल्या शिवकालीन  किल्‍ला रांगणागडावर सध्या पर्यटक, किल्‍लेप्रेमींसह विद्यार्थ्यांची वर्दळ वाढत आहे.  मात्र, येथील अपुर्‍या सोई- सुविधांचा फटका पर्यटकांना बसत असल्याचे दिसून येत आहे.शासनाचे या ऐतिहासिक स्थळाकडे दुर्लक्ष होत असून पालकमंत्र्यांनी आपल्या‘चांदा ते बांदा’ योजनतून या पर्यटन स्थळाचा विकास साधावा,अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्‍त  होत आहे.
सिंधदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्याच्या सिमेवर नारूर गावापासून काही अंतरावर ऐतिहासिक  ‘रांगणागड’किल्‍ला  उभा आहे. 

सह्याद्रीच्या पायथ्याशी महालक्ष्मी देवीचे प्राचीन मंदिर आहे. सद्यस्थितीत  येथे तळकोकण व घाटमाथ्यावरून   अनेक पर्यटक, किल्‍लेप्रेमी दाखल होत आहेत. हे पर्यटक नारूर येथून डोंगर कपारीतून पायी चालत हा गड सर करत आहेत. तर कोल्हापूरहून पाटगांव- तांब्याचीवाडी चिकेवाडीमार्गे वाहनांनी किल्‍लेप्रेमी गडाच्या हद्दीपर्यंत वाहनाने येत गडावर मार्गक्रमण करत आहेत. साहसी पर्यटक रात्री मुक्‍कामासाठी गडावर वास्तव्य करण्यासाठी येतात. मात्र, येथे राहण्यासाठी पुरेशी कोणतीही व्यवस्था नसल्याने जोरदार वारे अंगावर झेलत झाडाखालीच पर्यटकांना रात्र काढावी लागत आहे. तर काहीजण  वार्‍याच्या बचावासाठी  येथील मंदिराचा आसरा घेतात. 

गडावर दिवाबत्तीचीही सोय नाही. गडावर एक तलाव असून तिथे बारमाही पाणी उपलब्ध असते.  संबंधित विभागाचे  या गडाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने ‘रांगणागड’अनेक समस्यांच्या जाळ्यात अडकला आहे. हौशी पर्यटक गडाच्या किनारी पट्ट्यांवर उभे राहून सेल्फीचा आनंद घेत असतात मात्र, हा आनंद कधीही जीवावर बेतू शकतो, याचाही गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. गेली कित्येक वर्षे या गडाच्या डागडुजीबाबत पर्यटकांकडून जोरदार मागणी होत आहे. मात्र, अद्यापही पुरातत्व विभागाने याची दखल घेतली नाही. 

छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या रांगणागडावर जाणार्‍या पर्यटकांना सुलभ व्हावे यासाठी पायाभूत सोयी-सुविधा निर्माण व्हावी यासाठी शिवसेना खा. विनायक राऊत यांनी जिल्हा वार्षिक नियोजन सन 2017-18 च्या पर्यटन कार्यक्रमातंर्गत निधी मंजूर करणेबाबत जिल्हाधिकारी यांना लेखीपत्राने कळविले आहे. यामध्ये रांगणागड येथे फेब्रिकेटेड स्टीलमध्ये प्रवेशद्वार व केबिन तयार करणे, गडावर जाणार्‍या पायवाटेवर निरीक्षण मनोरा तयार करणे, वाटेवर कचराकुंड्या बसविणे, पायवाटेवर बैठक व्यवस्था तयार करणे, पायवाटेवरील धबधब्याच्या ठिकाणी बैठक व्यवस्था तयार करणे, फेब्रिकेटेड स्टीलमध्ये पायवाटेवार रेलिंग तयार करणे आदी कामांचा समावेश आहे. ही कामे पूर्ण झाल्यास खर्‍या अर्थाना पर्यटकांना नारूर येथून रांगणागडावर जाणे सहज सुलभ होणार आहे.  हे पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.