होमपेज › Konkan › महामार्ग जलमय; ग्रामस्थांनी वाहतूक रोखली

महामार्ग जलमय; ग्रामस्थांनी वाहतूक रोखली

Published On: Jun 19 2018 1:31AM | Last Updated: Jun 18 2018 10:42PMकणकवली : नितीन सावंत

महामागै चौपदरीकरणाचे काम करताना जुन्या मार्गावरील मोर्‍या बुजल्या गेल्याने पावसाच्या पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने ओसरगाव-गवळवाडीत महामार्ग जलमय झाला. भातशेती पाण्याखाली गेली व घरांमध्ये पाणी जाण्याचा धोका निर्माण झाल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी महामार्गावरील वाहतूक रोखली. ठेकेदार कंपनीच्या प्लँडवर जाणार्‍या गाड्या ग्रामस्थांकडून अडविण्यात आल्या. ठेकेदार कंपनीकडून बुजलेल्या मोर्‍या मोकळ्या करून पाण्याचा प्रवाह सुरू केल्याने भातशेतीतील पाणी ओसरू लागले. सोमवारी सकाळी 9  ते दु.2 वा. पर्यंत महामार्गावर हा प्रकार सुरू होता.

महामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना ठेकेदार कंपनीकडून ओसरगावात जुन्या महामार्गावरील मोर्‍यांवर भराव टाकण्यात आला. तर नवीन मार्गावर मोर्‍या टाकताना त्याची जागा बदलण्यात आली. त्याविषयी ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतरही त्याची दखल ना प्रशासनाने घेतली ना ठेकेदार कंपनीने. जुन्या मार्गावरील मोर्‍यांना नवीन मार्गावरील मोर्‍या जोडणे आवश्यक होते. तसे न केल्याने ओसरगावात अनेक ठिकाणी जुन्या मार्गावरील मोर्‍या भरावात गाडल्या गेल्याने पाण्याचे प्रवाह बंद झाले होते. रविवार रात्रभर झालेल्या पावसाने सोमवारी सकाळी ओसरगाव-गवळवाडी, आंबेरकर दुकान स्टॉप येथे वाहतूक सुरू असलेला जुना महामार्ग जलमय झाला. लगतची भातशेती पाण्याखाली गेली. पाणी साचून राहिल्याने अनील रावजी परब  यांच्या दहा गुंठे क्षेत्रातील भातपेरणी दोन दिवस पाण्याखाली होती. त्यांच्या विहिरीतही पाणी गेले होते. तर मारूती सोमा राणे यांच्या भातशेती व विहिरीमध्ये पाणी साचले होते. सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर असल्याने पाण्याची पातळी वाढू लागली आणि गवळवाडीतील घरांमध्ये पाणी जाण्याचा धोका निर्माण झाला. 

चौपदीकरणातील चुकीच्या कामामुळे ही समस्या निर्माण झाल्याने ओसरगावमधील ग्रामस्थ आक्रमक झाले. सकाळी 8 वा.पासून ठेकेदार कंपनीचे अधिकारी, महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता यांच्याशी संपर्क साधण्यात आला.  मात्र कोणतीच उपाययोजना करण्यात येत नव्हती. पावसाचा जोर वाढत असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत होती. पाणी साचल्याने महामार्गावरील वाहतूक बंद झाली होती. प्रशासन अथवा ठेकेदार कंपनीकडून कोणतीच उपाययोजना न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी नवीन महामार्गावरून वाहतूक सुरू करून दिली.

शेती नुकसानीला जबाबदार कोण?

महामार्ग चौपदरीकरणात अनेक ठिकाणी जुन्या मोर्‍या गाढल्या गेल्याने ओसरगावात ठिकठिकाणी पाणी साचून राहिले आहे. भातशेतीत पाणी साचून राहिले असल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसापासून हे पाणी भातशेतीत साचलेले असल्याने त्याच्या नुकसानीला जबाबदार कोण? असा सवाल शेतकर्‍यांनी उपस्थित केला. 

...आणि पोलिस पोहोचले

ग्रामस्थांकडून सकाळी 9 वा. पासून आंदोलन सुरू होते. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी 2 वा. ग्रामस्थांनी आंदोलन थांबविल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले.

पाण्याचा लोंढा भातशेतीत

भरावात गाढली गेलेली नवीन मोरी सापडल्यानंतर तुंबलेल्या पाण्याला मार्ग मोकळा करून देण्यात आला. मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबलेले असल्याने एकच लोंढा मोरीतून बाहेर पडला. नवीन मोरीची जागा बदलून ती ओहोळापासून काही अंतरावर असल्याने हा पाण्याचा लोंढा लगतच्या भातशेतीत घुसला. चिखलमातीसह पाण्याचा लोंढा भातशेतीत घुसल्याने काही क्षणात पेरणी केलेले भाताचे वाफे गाळाखाली गेले. मोरीतून बाहेर पडलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे धोंडू धेनू राणे, चंद्रकांत सिताराम राणे, अंकुश आंगणे आदी शेतकर्‍यांचे नुकसान झाले.