Thu, Mar 21, 2019 23:58
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › खारेपाटण येथे महामार्ग रोखला

खारेपाटण येथे महामार्ग रोखला

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 1:33AMखारेपाटण/फोंडाघाट : वार्ताहर

खारेपाटण येथील सकल मराठा बांधवांनी आपल्या गनिमी काव्याने सकाळी अचानक 11 च्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर पिकअप शेडजवळ टायर पेटवून महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. जवळच्या चेकपोस्ट पोलिस स्टेशन ठाण्याचे प्रमुख पांडुरंग राऊत यांनी टायर बाजूला करून वाहतूक सुरू केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाविरुद्ध केलेल्या चुकीच्या वक्तव्याचा प्रतिकात्मक निषेध म्हणून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग काही काळ रोखण्यात आला. दरम्यान, कुडाळ येथे झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर 26 जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाचे नेते अ‍ॅड. सुहास सावंत यांनी या बंदमध्ये सर्वांनी सहभागी होण्याची हाक दिली आहे.

मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यात आंदोलनाची तीव्रता वाढत असताना कोकणातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. मंगळवारी मराठा समाज आरक्षण मागणीसाठी  फोंडाघाट दशक्रोशीतील मराठा समाज कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. तसेच व्यापारी बांधवांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला व्यापार्‍यांनीही प्रतिसाद देत सायंकाळपर्यंत दुकाने बंद ठेवली. 

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान एका मराठा कार्यकर्त्याने आत्मबलिदान केल्याने या आंदोलनाची झळ अधिकच तीव्र झाली आहे. फोंडाघाट बाजारपेठेत मंगळवारी मराठा समाज कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. त्यामध्ये सर्वपक्षीय मराठा कार्यकर्त्यांचाही समावेश होता. या कार्यकर्त्यांनी हातात झेंडा घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. ‘कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ अशी घोषणाबाजीही केली. तसेच व्यापारी बांधवांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. व्यापार्‍यांनीही दुकाने बंद ठेवली. या आंदोलनादरम्यान आत्मबलिदान केलेल्या काकासाहेब शिंदे या तरूणाला श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी संदेश पटेल, राजू राणे,  राजू पटेल, सरपंच संतोष आग्रे, जि. प. सदस्य संजय आग्रे, संतोष टक्के, सुदेश लाड आदी उपस्थित होते. यावेळी फोंडाघाट चौकात मराठा समाज बांधवांनी आपली मनोगते व्यक्त करत मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आता समाजबांधव स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा दिला.