Thu, Apr 25, 2019 15:24होमपेज › Konkan › संततधार पावसामुळे महामार्ग ठप्प 

संततधार पावसामुळे महामार्ग ठप्प 

Published On: Jul 06 2018 1:32AM | Last Updated: Jul 05 2018 10:45PMखेड : प्रतिनिधी 

गेल्या दोन दिवसांपासून पडणार्‍या पावसामुळे खेडमधील नारिंगी आणि जगबुडी पुलांवर पाणी आल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील वाहतूक बंद केली आहे. ‘जगबुडी’च्या पाण्याची पातळी आठ मीटरवर गेल्याने पुलावरून गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत पाणी वाहत होते. दोन्ही बाजूंना तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून महामार्ग ठप्प झाला आहे. 

एकीकडे रायगडमध्ये दासगावमध्ये दरड कोसळून महामार्ग सुमारे सात तास ठप्प होता. त्यात भर म्हणून आता जगबुडी पूल वाहतुकीस बंद केल्याने महामार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली. गुरुवारी सायंकाळी 4.30 पासून पावसाचा जोर वाढल्याने खेड पोलिसांकडून जगबुडी पूल वाहतुकीस बंद करण्यात आला. सुरुवातीला एक-एक वाहन सोडण्यात येत होते. मात्र, त्यानंतर पाणी वाढल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली.

संततधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने एस.टी.च्या अनेक फेर्‍या रद्द करण्यात आल्या. शहरात कामासाठी आलेल्या ग्रामीण भागातील रहिवाशांना परतीच्या प्रवासात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. शहरातील मटण-मच्छी मार्केट परिसरात पाणी शिरले असून जगबुडी किनार्‍यावरून बंदर भागाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. नारिंगी नदीनेदेखील धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी परिसरातील शेकडो एकर भातशेतीमध्ये शिरले आहे. शहरातील काही शाळांना अतिवृष्टीमुळे सुट्टी देण्यात आली असून प्रशासनातर्फे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. 

खेड तालुक्यात गेल्या दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे जगबुडी, नारिंगी, चोरद आदींसह सर्वच लहान-मोठ्या नद्यांना पूर आला आहे. मुसळधार कोसळणार्‍या पावसाने मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी माती रस्त्यावर आली आहे. तर महामार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे महामार्गावर चिखलाचे साम्राज्य आहे. कशेडी घाटातील आंबा स्टॉप नजीक अवघड वळणावर बुधवार दि. 4 रोजी सायंकाळच्या सुमारास एक कंटेनर रस्त्यानजीक उलटला असून दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. धामणदेवीनजीक अवघड वळणावर एक मालवाहू ट्रक निसरड्या रस्त्यावरून उलटला. या अपघातात देखील एकजण किरकोळ जखमी झाला आहे.    

संततधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी सात मीटर झाली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी काही तास थांबवली होती. बुधवारी रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे जगबुडी व नारंगी नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. नारिंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे एकवीरानगर परिसरातील खेड-दापोली मार्गावर सुर्वे इंजिनिअरिंग नजीक नदीचे पाणी शिरले आहे. दापोली मार्गावरील वाहतूक क्षेत्रफळनगर मार्गे वळवण्यात आली असून खेडहून दापोली, बहिरवली खाडीपट्टा आदी भागांकडे जाणार्‍या एसटीच्या अनेक फेर्‍या रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. 

अतिवृष्टीने शहरात जगबुडी  नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरण्याचा धोका लक्षात घेता खेड नगर परिषदेने नागरिकांना सतर्क राहण्यासाठी ध्वनीक्षेपकाद्वारे इशारा दिला आहे. जगबुडी नदी धोक्याची पातळी ओलांडत असल्याचे लक्षात येताच नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी बाजारपेठेतील व्यापार्‍यांना सतर्क राहून नुकसान टाळण्यासाठी पुराचा धोका संभवणार्‍या भागातून दुकानातील साहित्य तात्पुरते सुरक्षित ठिकाणी नेण्यास सांगितले. पावसाची संततधार सुरूच असल्याने शहरात अनेक ठिकाणी वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. महावितरण कर्मचार्‍यांकडून विद्युतपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी कामगारांच्या मर्यादित संख्येमुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी तासनतास नागरिकांना अंधारात रहावे लागले. तालुक्यातील खवटी बौद्धवाडीमध्ये नातूवाडी धरणाच्या कालव्याचे पाणी ग्रामस्थांच्या घरात शिरुन मोठे नुकसान झाले.

महामार्ग निसरडा.. अनेक ठिकाणी अपघात

कशेडी घाटात काही ठिकाणी दरडी खाली येत आहेत, तर खवटीपासून पुढे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी घाटमाथ्यावर दरडी खाली आल्या आहेत. त्यामुळे रस्ता चिखलमय होऊन निसरडा झालेला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहने सावकाश हाकावीत. अवघड वळणांवर ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन कशेडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक मधुकर गमरे यांनी केले आहे.