Tue, Jul 07, 2020 08:46होमपेज › Konkan › हायवेला जोडणार्‍या रस्त्यांचे ‘क्रॉसिंग’अधांतरीच!

हायवेला जोडणार्‍या रस्त्यांचे ‘क्रॉसिंग’अधांतरीच!

Published On: May 22 2019 1:37AM | Last Updated: May 21 2019 10:35PM
कणकवली : अजित सावंत

गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या कोकणवासीयांना महामार्ग चौपदरीकरणामुळे मोठा दिलासा मिळाला असला तरी या चौपदरीकरणामुळे मात्र वाहतुकीचे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. सिंधुदुर्गातील झाराप ते खारेपाटण यादरम्यान मुंबई-गोवा महामार्गाला जोडणार्‍या अनेक महत्त्वाच्या जिल्हा, राज्य आणि ग्रामीण मार्गांच्या ठिकाणी  महामार्गावर क्रॉसिंगसाठी  कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. 

पर्यायाने या वर्दळीच्या महामार्गावरून ये-जा कशी करायची, या विवंचनेत त्या-त्या भागातील नागरिक आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी आता अंडरपास आणि सर्कलसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

कोकण आणि मुंबईचा असणारा मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणच्या विकासातील महत्त्वाचा घटक आहे. या अरुंद महामार्गावर वाढती वाहतूक व अपघातांच्या संख्येमुळे हा महामार्ग चौपदरीकरणाची मागणी गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने केली जात होती. अखेर 2014 साली या चौपदरीकरणाला मुहूर्त मिळाला आणि चौपदरीकराची प्रक्रिया सुरू झाली. गेल्या दोन वर्षांपासून सिंधुदुर्गात झाराप ते खारेपाटण 90 कि.मी. लांबीच्या चौपदरीकरणाला सुरुवात झाली. यासाठी ग्रामीण भागात 60 मीटर आणि शहरी भागात 45 मीटर जागा संपादित करण्यात आली.  सिंधुदुर्गात आतापर्यंत जवळपास 40 कि.मी.चा चौपदरी महामार्ग पूर्ण झाला आहे.

एकीकडे  महामार्गाचे काम युध्दपातळीवर सुरू असले तरी या महामार्गाला जोडणार्‍या अनेक राज्य, जिल्हा आणि ग्रामीण मार्गांच्या जोडरस्त्यांवरून महामार्गावर क्रॉसींगसाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. यामध्ये कणकवली तालुक्यातील हळवलफाटा, तरंदळेफाटा, बोर्डवेफाटा, साकेडीफाटा कणकवली शहरातील गांगोमंदिर-टेंबवाडी रस्ता,  कुडाळ तालुक्यातील घावनळेफाटा अशा अनेक रस्त्यांचा समावेश आहे. हळवल फाट्यावरून हळवल, शिरवल, कळसुली, शिवडाव, दारिस्ते, घोटगे, जांभवडे, सोनवडे आदी दशक्रोशीतील गावांमध्ये जाणार्‍या वाहनांची वर्दळ असते. तर तरंदळे फाट्यावरून तरंदळे, भरणी, साळशी, शिरगांव, चाफेड, कुवळे, पिसेकामते, बिडवाडी, माईण आणि देवगड पर्यंत जाणार्‍या वाहनांची वर्दळ असते. बोर्डवे फाट्यावरून बोर्डवे, आंब्रड, कळसुली, कुंदे, पोखरण, पांग्रड आदी भागात वाहने जातात. कणकवली शहरामध्ये गांगोमंदिर ते आचरा रोड असा डीपी रोड करण्यात आला आहे. त्याच्या समोरच टेंबवाडीकडे जाणारा रस्ता आहे. या महत्वाच्या रस्त्याच्या ठिकाणी क्रॉसींगसाठी अंडरपास आवश्यक आहे. मात्र त्याचा विचार महामार्गाच्या आराखड्यात केलेला नाही. तरंदळेफाटा, हळवलफाटा, गांगोमंदिर, घावनळेफाटा आदी ठिकाणी अंडरपाससाठी ग्रामस्थांनी आंदोलने केली आहेत. मात्र त्याला महामार्ग प्राधिकरणकडून कोणतेही ठोस आश्‍वासन मिळालेले नाही.  अंडरपास न झाल्यास भविष्यात त्या त्या ठिकाणी क्रॉसींगवेळी अपघात होवून मनुष्यहानी होवू शकते. कणकवलीतील गडनदी पुलानजीक हळवल फाट्यावरून त्या भागातील वाहतूक सुरू होते. या ठिकाणी महामार्ग पूर्णपणे वळणदार करण्यात आला असून हळवल फाट्याकडे क्रॉसींगसाठी मात्र कोणतीही उपाययोजना अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे हळवल फाट्यावरून कणकवली शहरात येण्यासाठी नाईक पेट्रोलपंपापर्यंत वळसा मारावा लागणार आहे. आधीच या मार्गावर रेल्वे फाटकामुळे हळवल, कळसुली दशक्रोशीतील ग्रामस्थ त्रस्त आहेत. त्यात आता या महामार्गाच्या क्रॉसींगची भर पडणार असून ग्रामस्थ आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.त्यामुळे त्या ठिकाणी क्रॉसींग आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना आवश्यक आहेत. 

तरदंळे फाट्यावरही तीच स्थिती आहे. या ठिकाणीही ग्रामस्थांनी अंडरपासची मागणी केली आहे. कणकवली-गांगोमंदिर रस्त्याच्या ठिकाणीही बॉक्सेल भिंतीला अंडरपासची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे. मात्र अधिकारी आता हात झटकून मोकळे होत आहेत. आराखडा आता फायनल झाला असून आमच्या हातात मंजुरीचे अधिकार नाहीत, भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडूनच मंजुरी मिळणे आवश्यक असल्याचे अधिकारी सांगत आहेत. मात्र ज्या कुठल्या एजन्सीने महामार्गाचा आराखडा बनविला त्यांनी असे महत्वाचे जोडमार्ग आणि त्यावरील क्रॉसींगसाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र त्या सुचविलेल्या नसल्याने त्याचा फटका आता लोकांना बसणार आहे. 

कणकवली शहरामध्ये गडनदीपुलापासून ते न्यायालयापर्यंत बॉक्सेल भिंत बांधून भराव टाकला जात आहे. यामुळे एसटीच्या विभागीय कार्यशाळेकडे जाणारा रस्ता दहा फूट खाली गेला असून या रस्त्यावरून सर्व्हीसरोडवर येण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्याच भागात महावितरण, कृषी विभाग यांची कार्यालये आहेत. त्यामुळे या वर्दळीच्या मार्गावर ठोस उपाययोजना आवश्यक आहे.मात्र सद्यस्थिती पाहता कधी एकदा महामार्गाचे काम पूर्ण करतो अशा मनस्थितीत ठेकेदार एजन्सी आहे. महामार्ग प्राधिकरणचे अधिकारीही ठेकेदार एजन्सीच्या तालावर नाचल्यासारखेच वागत आहेत, असा नागरीक आणि लोकप्रतिनिधींचा आरोप आहे.

एकीकडे महामार्ग चौपदरी होत असताना जनतेच्या सोयीसुविधांचाही विचार होणे आवश्यक आहे. मात्र तो केलेला नाही. उलट आता आम्ही काहीही करू शकत नाही, आराखडा फायनल झाला आहे, असा कांगावा अधिकारी करत आहेत. जर जनतेसाठीच महामार्ग होत असेल तर त्याच जनतेसाठी सोयीसुविधाही द्यायला हव्यात. अंतर्गत रस्त्यांचेही योगदान तेवढेच महत्वाचे आहे. ग्रामीण भागातून शहराकडे आणि शहरातून ग्रामीण मार्गाकडे एसटी व इतर वाहनांची वाहतूक होत असते, तीच वाहतूक आता नियोजनाअभावी अडचणीत आली आहे. कणकवली शहराच्या मध्यवर्ती असलेल्या बसस्थानकावरून गाड्या सर्व्हीसरोड येण्यासाठी आणि सर्व्हीसरोडवरून बसस्थानकात येण्यासाठीदेखील उपाययोजना आवश्यक आहे.  आणखी वर्षभरात महामार्ग चौपदरीकरण होईल, मात्र जोड रस्त्यांवरील वाहतुकीचा बोजवारा उडणार हे निश्‍चित आहे. याचा लोकप्रतिनिधी आणि महामार्ग अधिकार्‍यांनीही गांभिर्याने विचार करायला हवा.