Wed, Jul 17, 2019 00:23होमपेज › Konkan › शासनाने आम्हालाही नुकसान भरपाई द्यावी

शासनाने आम्हालाही नुकसान भरपाई द्यावी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कणकवली : शहर वार्ताहर  

शहरातील हायवे लगतचे कित्येक वषार्ंचे स्टॉल महामार्ग चौपदरीकरणात हटविले जाणार आहेत. यामुळे 40 ते 50 स्टॉलधारकांची कुटुंबे रस्त्यावर येणार आहेत.चौपदरीकरणात संपादित झालेल्या जमिनी व मालमत्तेचा मोबदला मिळणार आहे. परंतु हे स्टॉल अधिकृत नसल्याने शासनाने सहानभूती दर्शवत स्टॉलधारकांना नुकसान भरपाई द्यावी,या मागणीसाठी  स्टॉलधारक तसेच लोकप्रतिनधींची बैठक शुक्रवारी कणकवली गांगोमंदिरात झाली. यावेळी संबंधित प्रशासनाला निवेदन व मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले.

नगरसेवक सुशांत नाईक, वाहतूक आघाडी प्रमुख शिशिर परुळेकर,सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. गेले दोन पिढ्या हे स्टॉलधारक हायवेलगत आपला व्यवसाय थाटून उदरनिर्वाह करत आहेत. चौपदरीकरणात जात असलेल्या अधिकृत जमिनी व मालमत्तेचा मोबदला मिळणार आहे. परंतु हे स्टॉल अधिकृत नसून त्यांच्या होणार्‍या नुकसानीचा  मोबदला मिळावा अन्यथा स्टॉलधारकांना अन्य ठिकाणी प्रस्थापित करावे, असा एकमुखी निर्णय स्टॉलधारकांनी घेतला. 

महामार्ग जमीन भूसंपादनावेळी ज्या प्रमाणे झाडांचे भविष्यातील 25 वर्ष आयुर्मान तसेच त्यापासून मिळणारे उत्पन्न विचारात घेवून मूल्यमापन करण्यात आले. त्याचप्रमाणे स्टॉलधारकांनाही सहानुभूती दर्शवत नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. यासाठी संबंधित प्रशासनाकडे आपल्या मागण्याचे वैयक्‍तिक निवेदन व त्यासोबत आपल्या स्टॉलचा फोटो तसेच इतर स्टॉलसंबंधी कागदपत्रे असल्यास ती जोडून द्यावीत, असे नगरसेवक सुशांत नाईक, शिशिर परुळेकर, सुजित जाधव यांनी सांगितले. यावरून सर्वानुमते 27 नोव्हेंबर रोजी खा. विनायक राऊत व  30 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौर्‍यावर येणारे बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांची भेट घेवून यासंदर्भात चर्चा करुन निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.चानी जाधव, पांडू वर्दम, सागर वारंग, श्री. पारकर, श्री. लाड , श्री. चिंदरकर, सौ. कांबळी, सौ. मर्ये, श्री . बोर्डवेकर, श्री. पिळणकर आदी स्टॉलधारक उपस्थित होते.

व्यापारी संकुलात स्टॉलधारकांना न. प. ने प्राधान्य द्यावे : सुशांत नाईक

महामार्ग चौपदरीकरणात वर्षानुवर्षे असलेले अनेक स्टॉलधारक विस्थापित होणार आहेत. त्यांना शासनाकडून खरेतर भरपाई मिळणे आवश्यक आहे. मात्र नगरपंचायतीने या स्टॉलधारकांबाबतीत मदतीची भूमिका घेतली पाहिजे. न. प. चे जे व्यापारी संकुल होईल त्यामध्ये या स्टॉलधारकांना प्राधान्य दिले पाहिजे, जेणेकरून ते आपला उदरनिर्वाह करू शकतील, अशी मागणी नगरसेवक सुशांत नाईक यांनी केली.