Thu, Apr 25, 2019 06:16होमपेज › Konkan › हायवे प्रशासनाला अल्टिमेटम

हायवे प्रशासनाला अल्टिमेटम

Published On: Apr 21 2018 1:00AM | Last Updated: Apr 20 2018 11:14PMकुडाळ : प्रतिनिधी

पोलिसांना आणून आम्हाला आत टाकण्याची भाषा दिलीप  बिल्डकॉन या महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनीने करू नये आणि  अधिकारी म्हणून तुम्हीही  करू नका. झाराप हे महत्त्वाचे केंद्रस्थानी असलेले ठिकाण आहे. त्यामुळे आमच्या रास्त मागण्यांचे सोमवारी (दि. 23) लेखी पत्र द्या; अन्यथा महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी आम्ही उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी महामार्ग रस्ते विभागाचे उपअभियंता शेडेकर यांना दिला. यावेळी शेडेकर यांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.

झाराप  ग्रामपंचायत येथे दोन दिवसांपूर्वी रद्द झालेली नियोजित बैठक शुक्रवारी सकाळी झाली. यावेळी झाराप सरपंच सौ. स्वाती तेंडुलकर, महामार्ग विभागाचे उपअभियंता श्री. शेडेकर, जि.प. सदस्य राजू कविटकर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी  सध्या सुरू असलेल्या कामाकडे  लक्ष वेधत कोणत्याही परिस्थितीत  आम्ही आमच्या न्याय्य  मागण्यांपासून हटणार  नाही. सद्यःस्थितीत  ठेकेदार कंपनीकडून रस्ता दुतर्फा टाकण्यात आलेल्या भरावामुळे  ठिकठिकाणी अपघात क्षेत्र बनले आहे. मोटारसायकलस्वारांना तर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो याची
 त्वरित दखल  घ्यावी,  अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

झाराप भावई मंदिरकडे जाणार्‍या  रस्त्यावर बॉक्सवेल बांधणे, सर्व्हिस रोड बांधणे, झाराप तिठ्यावर सर्कल मोठे करून क्रॉसिंगची व्यवस्था ठेवणे, झारापमधील  माणगाव व आडेली रस्त्यावरून पाईप लाईन टाकून पाणी निचरा  करणे, महामार्ग रस्ते विभागाने संपादित केलेल्या  जमिनीची हद्द निश्‍चित  करून घ्या, पावसापूर्वी पिण्याच्या पाण्याची  लाईन संबंधित यंत्रणेला सांगून पूर्ण करून घ्या आदी प्रमुख मागण्यांकडे उपस्थित ग्रामस्थांनी  प्रामुख्याने शेडेकर यांचे लक्ष वेधले. 2009 मध्ये गटारे असताना पावसाळी मौसमात 2 घरे वाहून गेली. आता तर मोठ्या प्रमाणात भराव असल्याने या पावसाळी मौसमात येथील घरांना अधिक धोका निर्माण झाला आहे.यावेळी ठेकेदार कंपनीची माणसे आमच्यावर जोर जबरदस्ती करीत आहेत, याकडेही लक्ष वेधले. दरम्यान, या मागण्यांची पूर्तता करण्यासंबंधी लेखी आश्‍वासन सोमवार 23 एप्रिल रोजी न आणल्यास  1 मे रोेजी  आंदोलनावर आम्ही ठाम आहोत, असे उपस्थित ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले. 

चौपदरीकरणासाठी 60 मीटरची जमीन संपादित केलेली आहे. 45 मीटरमध्ये रस्ता होणार असल्याने रस्ता दुतर्फा शिल्‍लक साडे सात मीटर जमिनीमध्ये  तुम्ही काही पण करा, असे प्रशासनातीलच तुमचीच मंडळी सांगत आहेत. त्यामुळे गावात तंटे वाढत आहेत. परिणामी आता तुम्ही संपादित जमिनीत काहीही न करण्याचे लेखी पत्र ग्रामपंचायतला द्या, अशी विनंती शेडेकर यांना केली. यावेळी शेडेकर यांनी आपल्या मागणीनुसार आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही देत तुम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ येणार नसल्याचे सांगितले.   यावेळी सूर्यकांत सामंत, माजी उपसभापती बबन बोभाटे, राजू तेंडोलकर, प्रकाश सावंत, सुहास सावंत, श्री. विजय नाईक, बशीर खान, नाथा तेंडोलकर, प्रवीण सामंत, बंड्या  सामंत, पोलिस पाटील सुरेश गावकर, तुकाराम गोडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags : Kudal Highway administration, ultimatum, kokan news,