Tue, Jul 16, 2019 21:49होमपेज › Konkan › नोटिसाच मिळाल्या नाहीत तर अपील कसे करणार?

नोटिसाच मिळाल्या नाहीत तर अपील कसे करणार?

Published On: Dec 10 2017 1:19AM | Last Updated: Dec 09 2017 10:19PM

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी

जिल्हाधिकार्‍यांनी कणकवलीतील हायवे प्रकल्पग्रस्तांना लवादाकडे तक्रार दाखल करण्यासाठी 12 डिसेंबरची डेडलाईन दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी सायंकाळी येथील गांगोमंदिरात प्रकल्पग्रस्तांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांच्या भूमिकेबाबत प्रकल्पग्रस्तांनी साशंकता व्यक्‍त करत डेडलाईन देत जिल्हाधिकारी काम उरकून घेत असल्याचा आरोप केला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्याशी चर्चा करताना प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा एकदा समस्यांचा पाढा वाचला. ज्यांना नोटीसाच मिळाल्या नाहीत त्यांनी अपील कसे दाखल करायचे असा सवाल करण्यात आला.

या बैठकीला प्रमोद जठार यांच्यासह प्रकल्पग्रस्तांपैकी शिशीर परुळेकर, माधव शिरसाट, नितीन पटेल, सत्यवान मांजरेकर, रत्नाकर देसाई, बाबू आचरेकर, भूषण परुळेकर, सुनील परब, डॉ. संदीप नाटेकर, गुरुनाथ काळसेकर, जयप्रकाश महाडीक, राजेश आजगावकर, चंदू कांबळी, सुरेश परुळेकर, रामदास मांजरेकर आदी उपस्थित होते.

यावेळी प्रमोद जठार यांनी नोटीसा आल्या नाहीत म्हणजे तुमची प्रकरणे प्रांताधिकार्‍यांकडे पेंडींग आहेत असे सांगितले. मात्र प्रांताधिकारीही या हरकतींवर काहीच निर्णय देत नाहीत त्यामुळे आता काळ्या फीती त्यांच्या प्रवेशद्वारावर बांधल्या आता आमच्या गळ्यात बांधायची वेळ आलीय असे प्रकल्पग्रस्तांनी सांगत नाराजी व्यक्‍त केली.

प्रकल्पग्रस्तांनी मोबदल्याची रक्‍कम न स्विकारण्यावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. यावेळी प्रमोद जठार यांनी शासन तुमच्यासोबत आहे. कुणावरही अन्याय होवू देणार नाही. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न टप्या-टप्याने सोडविण्यात येतील. सोमवारी 11 डिसेंबरला सकाळी 12 वा. प्रांताधिकार्‍यांशी भेट घेवून चर्चा करण्यात येईल. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केले.