Fri, Apr 26, 2019 03:38होमपेज › Konkan › गरीब मुलांना मदत करणे ही देशसेवाच : शेटे

गरीब मुलांना मदत करणे ही देशसेवाच : शेटे

Published On: Jun 01 2018 2:06AM | Last Updated: May 31 2018 8:54PMकुडाळ : वार्ताहर

देशाच्या सीमेवर  लढणे  याला आपण देशसेवा म्हणतो त्याचप्रमाणे गरीब गरजू मुलाला शिक्षण देणे त्याला आर्थिक मदत केली तर ती सुध्दा देशसेवाच होते, असे मत मुख्यमंत्र्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश शेटे यांनी व्यक्‍त केले.

बॅ.नाथ पै नर्सिंग  महाविद्यालयात जागतिक परिचर्या  दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी कर्करोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत न्याती उपस्थित  होते. ओमप्रकाश  शेटे म्हणाले, कोकण ही नररत्नांची भूमी असून, या भूमीत  जन्माला यायला पुण्य लागते.  कोकणचा परिसर, संस्कृती, परंपरा  इथली माणसं, भूमी या सगळ्यातच  एक वेगळेपण आहे. या भूमीनेच अनेक कलावंत, विचारवंत, राजकारणी तसेच समाजकारणी व्यक्‍ती महाराष्ट्राला, देशाला दिल्या.  आपण कोल्हापूर पासून गोंदीयापर्यंत  व  मुंबई ते नागपूर अशा अनेक ठिकाणी कामानिमित्त  फिरलो व तो भाग  अनुभवला. मात्र,  या कार्यक्रमाच्या निमित्ताने  कोकणभूमी  अनुभवायला मिळाली.  

बॅ.नाथ पै यांच्या नावाने सुरू असलेल्या या नर्सिंग  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनींनी कौशल्यपूर्ण परिचारिकांचे प्रशिक्षण  घेत रुग्णसेवा करावी.  बॅ.नाथ पै यांच्या विचारांना साजेल असे कार्य करा, असे आवाहन केले. डॉ. प्रशांत न्याती म्हणाले, कर्करोग हा  जगाला पडलेला विळखा आहे.  अज्ञान आणि भीतीपोटी डॉक्टरकडे न जाता  आजाराची लक्षणे कळलेली असतानाही गप्प राहून  त्या आजाराला अंतिम टप्प्यात नेले जाते. अंतिम टप्प्यात या आजाराला आटोक्यात आणणे  वैद्यकीय शास्त्रालाही अशक्य होते. पर्यायाने उपचार  करण्याची  इच्छा असतानाही डॉक्टर माणसाला वाचवू शकत नाही. या आजाराचे प्रमाण पुरूषांच्या तुलनेत स्त्रीयांमध्ये जास्त असते.  

सद्यःस्थितीत बदलती जीवनशैली, राहणीमान, आहार, केमिकल युक्‍त आहार यात थोडा बदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थीनींनी  विचारलेल्या प्रश्‍नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिली. या कार्यक्रमाला बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर आदीसह प्राध्यापक, विद्यार्थी  उपस्थित होते.