Sun, Jul 21, 2019 01:26होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात धुवाँधार ; ठिकठिकाणी पडझड

सिंधुदुर्गात धुवाँधार ; ठिकठिकाणी पडझड

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 10 2018 10:38PMकणकवली : प्रतिनिधी

हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा अंदाज अचूक ठरवत सिंधुदुर्गात शनिवारी रात्रीपासून रविवारी दिवसभर धुवाँधार पर्जन्यवृष्टी झाली. ठिकठिकाणी वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे घरे, गोठे, शाळा, इमारतींवर झाडे पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या पहिल्याच धुवाँधार पावसामुळे नदीनाले प्रवाहित झाले आहेत. चढणीचे मासे पकडण्यासाठी खवय्यांची लगबग सुरू होती. यापूर्वी पडलेल्या पावसाने आधीच चिखलमय झालेला मुंबई-गोवा महामार्ग अनेक ठिकाणी जलमय झाला होता. रविवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात पावसाने जोरदार फटकेबाजी केली. सायंकाळच्या सत्रात पावसाचा जोर कमी झाला होता.

महाराष्ट्रात वेळेत आगमन झालेल्या मान्सूनने शनिवारी रात्रीपासूनच जोरदारपणे बरसण्यास सुरुवात केली. रविवारी दिवसभर अजिबात उसंत न घेता पाऊस धुवाँधारपणे बरसत होता. त्यामुळे मुख्य नद्यांसह ग्रामीण भागातील नदीनाले प्रवाहित झाले असून साखळ्या सुटल्या आहेत. रविवारी सुट्टीचा दिवस आणि त्यातच धुवाँधार पाऊस यामुळे अनेकांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले. 

या पावसामुळे ठिकठिकांचा भाग जलमय झाला होता. या दरमदार पावसामुळे बळीराजा सुखावला असून  पेरणीची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. तर शेत नांगरणीस शेतकर्‍यांनी सुरुवात केली आहे. रविवारच्या धुवाँधार पावसामुळे नदीनाले प्रवाहित झाल्याने चढणीचे मासे आणि खेकडे पकडण्यासाठी खवय्यांनी रविवारचा दिवस कारणी लावला. धुवाँधार पावसासह वादळी वार्‍याने अनेक ठिकाणी घरांवर, गोठ्यांवर झाडे, झाडाच्या फांद्या पडून नुकसान झाले. काही भागात वीज पुरवठादेखील खंडित झाला होता. कणकवली तालुक्यातही पावसामुळे ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. कणकवली-शिवाजीनगर येथील सिंधुसृष्टी इमारतीच्या आवारात सागाचे झाड कोसळले. तर साळीस्ते गावातील जि.प. शाळेवर फणसाचे झाड कोसळून छप्पराचे नुकसान झाले. कलमठ-गोसावीवाडीतील मिलन पाटील यांच्या पडवीवर गडगा कोसळून तर वाघेरी-मठखुर्द येथे घरावर काजूचे झाड कोसळून नुकसान झाले.