Sun, May 26, 2019 21:00होमपेज › Konkan › आगामी तीन दिवस पुन्हा जोर‘धार’

आगामी तीन दिवस पुन्हा जोर‘धार’

Published On: Jun 12 2018 12:52AM | Last Updated: Jun 11 2018 10:39PMरत्नागिरी : प्रतिनिधी

रविवारी 128 मि.मी. च्या सरासरीने सक्रिय झालेल्या मोसमी पावसाने सोमवारी विश्रांती घेतली. मात्र, आगामी 72 तासांत पुन्हा दक्षिण कोकणात जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने (आयएमडीने) वर्तविली आहे. दरम्यान, सोमवारी पावसाने उसंत घेतल्याने सखल भागांतील पाणी  ओसरण्यास मदत झाली. सोमवारी जिल्ह्यात 96.56 मि. मी. पावसाची नोंद झाली, तर पावसामुळे सुमारे साडेदहा लाखांची हानी झाली. यामध्ये लांजा तालुक्यात एका शेतकर्‍याच्या  मालकीच्या 45 शेळ्या पूर आलेल्या नदीत वाहून गेल्या.

गेल्या शनिवारी सुरू झालेल्या पावसाने रविवारी जिल्ह्यात दाणादाण उडवून दिली होती. अनेक भागांत मुसळधार आणि जोरदार सरी झाल्याने  शेतकरीवर्गात समाधान होते. मात्र,  आगमनानंतर दुसर्‍याच दिवशी पावसाचा जोर ओसरला. सोमवारी जिल्ह्यात सरींचा राबता सुरू होता. मात्र, त्यामध्ये सातत्य नसल्याने अनेक भागांत पावसाने उसंत घेतली. रविवारी जिल्ह्यात एकूण हजारी पार केलेल्या पावसाने सोमवारी एकूण 869 मि. मी. पर्यंत मजल मारली.

सोमवारी सर्वाधिक पाऊस लांजा तालुक्यात नोंदविला गेला. लांजा तालुक्यात 220 मि. मी. पाऊस झाला. जोरदार पावसाने  लांजा तालुक्यातील कोलते येथे पांडुरंग कोकरे या शेतकर्‍याच्या 45 शेळ्या नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्या. सर्वात कमी पाऊस दापोली तालुक्यात झाला. रविवारी 239 मि. मी. पाऊस झालेल्या रत्नागिरी तालुक्यात सोमवारी पावसाचा जोर ओसरल्याने 159 मि. मी. पावसाची नोंद झाली. रविवारी मुसळधार पावसाने जिल्ह्यात अनेक भागात दरडी आणि झाडे कोसळल्याने रस्ते बाधित झाले होते. 

दरम्यान, सोमवारी पावसाचा जोर ओसरल्याने पाण्याचा निचरा होण्यात मदत मिळाली. जिल्हा नियंत्रण कक्षाने सकाळी साडेदहा वाजता संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात सुमारे साडेदहा लाखांचे नुकसान झाल्याची नोंद केली आहे. यामध्ये  दापोली तालुक्यात एका शाळेचे आणि शौचालयाचे पावणे तीन लाखांचे नुकसान झाले. चिपळूण तालुक्यात वालोपे येथे घरात पाणी शिरल्याने 1 लाख 85  हजारांचे आणि रत्नागिरी तालुक्यात भाट्ये यथे घरात पाणी शिरल्याने 4 लाख 67 हजारांचे नुकसान झाले. राजापूर, लांजा आणि खेड तालुक्यासह रत्नागिरी तालुक्यातील बाजारपेठांमध्येही पाणी शिरल्याने अनेक व्यापार्‍यांचीही हानी झाली आहे. त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.