Sat, Dec 07, 2019 14:38होमपेज › Konkan › जिल्ह्यात मान्सूनपूर्वची जोरदार हजेरी

जिल्ह्यात मान्सूनपूर्वची जोरदार हजेरी

Published On: Jun 12 2019 1:19AM | Last Updated: Jun 12 2019 1:19AM
रत्नागिरी : प्रतिनिधी

अरबी समुद्रात सोमवारी निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या केंद्रामुळे कोकण किनारपट्टी भागात मंगळवारी जोरदार वार्‍यासह बिगर मोसमी पावसच्या सरी झाल्या. अनेक भागांत जोरदार आलेल्या पावसाला वार्‍याचीही साथ होती. 

सोमवारी हवामान विभागाने अरबी समुद्रात चक्रीवादळ होण्याचे संकेत दिले होते. त्याचा परिणाम कोकण किनारपट्टी भागावर होणार नसला तरी  सावधगिरीची उपाययोजना म्हणून प्रशासनाने खबरदारी घेतली होती. 10 जून ते 13 जून या कालावधीत मासेमारी करण्यास कोणीही समुद्रात जाऊ नये, असा इशारा देताना किनारपट्टीवरील गावांनाही सावध राहण्याच्या सूचना केल्या होत्या.  मंगळवारी सकाळपासून जिल्ह्यात जोरदार वार्‍यासह मळभी वातावरण होते. मात्र पावसाचा मागमूस नव्हता. सायंकाळी चारनंतर मात्र अनेक भागात बिगर मोसमीच्या सरी कोसळल्या.  रत्नागिरी तालुक्यात शिरगाव, मिरजोळे, हातखंबा, टिके, नेवरे, कोतवडे आणि शहराच्या भागातही पावसाने हलका शिडकावा केला. चिपळूण आणि संगमेश्‍वर तालुक्यात सोमवारी आणि मंगळवारीही जोरदार पावसाच्या सरी झाल्या. राजापूर तालुक्याला बिगर मोसमीच्या जोरदार सरी झाल्या होत्या. 

वार्‍याची साथ असल्याने कोसळलेल्या बिगर मोसमी पावसाला जोर नव्हता. चक्रीवादळाच्या परिणामाने अनेक भागात जोरदार वार्‍याने वादळीसदृश स्थिती निर्माण झाली. खबरदारीची उपाययोजना म्हणून महावितरणने अनेक भागात विजप्रवाह खंडित केला होता. रत्नागिरी तालुक्यात मिरजोळे, कुवारबाव, हातखंबा, खेडशी आदी भागांत जोरदार वारा, फांद्या तुटल्याने वीज प्रवाही खंडित करावा लागला.
मंगळवारी सायंकाळी 4 च्या सुमारास सुटलेल्या सोसाट्याच्या वार्‍यामुळे रत्नागिरी शहरातील न्यायालय परिसरात आंब्याचे झाड कोसळल्याने रत्नागिरी ते पावस रोडवर वाहतूक कोंडी  झाली होती. त्यामुळे जयस्तंभ, कॉलेज रोड,लाला कॉम्प्लेक्स या परिसरात वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. तर या परिसरातील वीज पुरवठाही खंडीत झाला होता. मंगळवारी सायंकाळी एक झाड रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका गाडीवर पडल्याने कारच्या काचा तसेच टप आणि मागील हौद्याचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यास सुरुवात केली. तर महावितरणच्या कर्मचार्‍यांनी विजेच्या तारा बाजूला केल्या. नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांकडून तुटलेले झाड बाजूला करण्याचे काम  केले.

कोकणसह अनेक भागांत आज मुसळधार

वायू चक्रीवादळामुळे राज्यातील नैऋत्य मोसमी पावसाचे (मान्सून) आगमन लांबणीवर पडले असले, तरीदेखील राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी बुधवारी वादळी वार्‍यांसह पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, तर उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. हा पाऊस मान्सूनपूर्वच असेल, असेही नमूद करण्यात आले आहे.

वायू चक्रीवादळ बुधवारी दक्षिण गुजरात राज्यात धडकणार असून, परिणामी बाष्पयुक्‍त ढगांची निर्मिती कोकण किनारपट्टी भागात होणार आहे. परिणामी, कोकणात वादळी वार्‍यांसह पाऊस पडणार असून, समुद्र खवळलेला असेल. तर मध्य प्रदेशात द्रोणीय स्थिती तयार झाली असून, या स्थितीमुळे उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 

दरम्यान, मान्सूनने कर्नाटकात मंगळवारी प्रवेश केला नसून तो उत्तर केरळमध्येच थबकला. केरळमधील कन्‍नूर येथे त्याची उत्तर सीमा (नॉर्दन लिमिट) होती. दरम्यान, गेल्या 24 तासांत मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली.