Thu, Jul 18, 2019 08:17होमपेज › Konkan › कोकणचा ‘पारा’ चढणार

कोकणचा ‘पारा’ चढणार

Published On: Mar 05 2018 9:23PM | Last Updated: Mar 05 2018 9:23PMरत्नागिरी : प्रतिनिधी

पहाटे धुक्याचे दाट दुलई,  हवेत गारवा तर सकाळी 7 वाजल्यापासूनच वाढत जाणारा उकाडा आणि अकरा वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत होणारी लाही लाही, असा अनुभव कोकणात सध्या जाणवत आहे. गेल्या महिन्यात उत्तर महाराष्ट्रात गारपीट झाल्यानंतर आता पुन्हा गारपिटीचे सावट असल्याने कोकणातील वातावरणात उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

कोकणातील जिल्ह्यात कमाल तापमानात वाढ झालेली आहे. मुंबई, ठाण्यातही तीव्र उकाडा जाणवत असून वाढत्या आर्द्रतेमुळे त्यात वाढ  होत आहे. या स्थितीत पुढील 24 तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात कमाल तापमानात मोठा बदल होणार नसला तरी उकाडा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  मात्र, त्यानंतरच्या 24 तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.

शिमग्यानंतर कोकणात अधिकच उष्मा वाढला असून तापमानापेक्षा हवेतील आर्द्रता वाढल्याचा अंदाज आहे. पुढील पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा वाढत जाण्याची चिन्हे आहेत. राज्यात खासकरून विदर्भात कमाल तापमानाची वाटचाल ‘चाळीशी’कडे सुरू झाली आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान कोकणातील रायगड जिल्ह्यातील भीरा येथे 41 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आली असून अन् रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान 35 ते 38 अंश सेल्सियसकडे सरकले आहे.