Sun, Apr 21, 2019 05:53होमपेज › Konkan › रिफायनरी प्रकल्पाबाबत देवगडात आज सुनावणी

रिफायनरी प्रकल्पाबाबत देवगडात आज सुनावणी

Published On: Dec 21 2017 1:52AM | Last Updated: Dec 20 2017 10:47PM

बुकमार्क करा

देवगड : प्रतिनिधी

राजापूर-नाणार येथे होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पासाठी देवगड तालुक्यातील गिर्ये-रामेश्‍वर येथील आवश्यक जमिनीच्या दीड हजाराहून अधिक भूधारकांनी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नोटिसांवर हरकती नोंदविल्या आहेत. त्या अनुषंगाने या हरकतींवर सुनावणीसाठी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयाकडून गिर्ये व रामेश्‍वर गावांतील ग्रामस्थांना 21 व 22 डिसेंबर रोजी हरकतींवर सुनावणी देवगड तहसीलदार कार्यालयात होणार आहे. यासाठी पोलिस बंदोबस्तदेखील ठेवण्यात आला आहे.

गिर्ये-रामेश्‍वर येथे रिफायनरी प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेतील पहिली नोटिस प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी गिर्ये-रामेश्‍वर गावांतील अडीच हजार ग्रामस्थांना देण्यात आली. यावर सुमारे दीड हजार ग्रामस्थांनी या नोटिसांवर आपल्या हरकती प्रांत अधिकारी कार्यालयात नोंदविल्या आहेत. या हरकतींवर प्रांत अधिकार्‍यांकडून गुरुवार 21 डिसेंबर रोजी गिर्ये गावातील हरकती नोंदविलेल्या भूधारकांची देवगड तहसीलदार कार्यालयात सुनावणी होणार आहे. तर शुक्रवार 22 डिसेंबर रोजी रामेश्‍वर गावातील ग्रामस्थांची हरकती नोंदविलेल्या भूधारकांची सुनावणी होणार आहे.

रिफायनरी प्रकल्पाला येथील जनतेचा तीव्र विरोध आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रकल्प होऊ देणार नसल्याचे गिर्ये-रामेश्‍वर जनतेचे ठाम मत आहे. यामुळे या सुनावणीच्यावेळी संपूर्ण देवगड तालुक्याचे लक्ष वेधून राहिले आहे. गिर्ये-रामेश्‍वर या दोन्ही गावांमध्ये रिफायनरीविरोधी संघर्ष समितीदेखील नेमण्यात आली आहे. या संघर्ष समितीच्या माध्यमातून वेळोवेळी गावांमध्ये बैठका घेऊन या विनाशकारी प्रकल्पाला जनतेने तीव्र विरोध दर्शविला आहे.