Sun, Jul 21, 2019 01:29होमपेज › Konkan › भिरवंडे गावात होतोय हरिनामाचा गजर

भिरवंडे गावात होतोय हरिनामाचा गजर

Published On: Jan 28 2018 11:59PM | Last Updated: Jan 28 2018 11:03PMकणकवली : वार्ताहर

भिरवंडे येथील श्री देव रामेश्‍वर मंदिरात हरिनाम सप्ताहानिमित्त बुधवारपासून अखंड हरिनामाचा गजर सुरू आहे. भजन, चित्ररथ, संगीत गायन, बालदिंडी याबरोबरच पालखी सोहळा, महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचा लाभ भाविक घेत आहेत. हा हरिनाम सप्ताह बुधवार 31 जानेवारी रोजी दुपारी 2 वा. पर्यंत सुरू राहणार आहे.

भिरवंडे येथील श्री देव रामेश्‍वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मुुंबईसह विविध भागातून गावातील मंडळी, पाहुणे, माहेरवाशीणी मोठ्या संख्येने भिरवंडे गावामध्ये दाखल झाले आहेत. हरिनाम सप्ताहामध्ये बुधवारी दुपारपासून घटस्थापनेनंतर अखंड हरिनाम सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थांबरोबरच परिसरातील व जिल्ह्याच्या विविध भागातून येणारे भजनी मंडळे, दिंड्या यामुळे हरिनाम सप्ताह अधिक रंगतदार होत आहे.

हरिनाम सप्ताहामध्ये नागवे येथील नागेश्‍वर प्रा. भजन मंडळाचे बुवा वैभव नानचे, कोटेश्‍वर प्रा. भजन मंडळ हरकुळ बुद्रुकचे बुवा सुजित परब यांनी उपस्थिती लावली. कुडाळ येथील संगीत अभंग गायन तेंडुलकर यांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले. मुंबई-मालाड येथील बुवा एकनाथ गुरव तसेच असरोंडी श्री लिंगेश्‍वर पावणादेवी दिंडीनृत्य भजनाने वाहवा मिळवली. शनिवारी रात्री देवगड-शिरवली येथील बाल भजन, केंद्रशाळा नागवेचा चित्ररथ व हरकुळखुर्द गावडेवाडी प्राथमिक शाळेच्या बालदिंडीने हरिनाम सप्ताह अधिक रंगतदार झाला. 

मंदिरात शनिवारी रात्री मुंबई-जोगेश्‍वरी येथील रामेश्‍वर प्रासादिक भजन मंडळाकडून भजन सादर करण्यात आले. बुवा सतीश सावंत, सुनील सावंत यांनी अभंग, गवळणी म्हणून भाविकांना मंत्रमुग्ध केले.  ‘या भिरवंडे गावात देव रामेश्‍वर मंदिरात’ स्वरचित गजरातून बुवा सतीश सावंत यांनी दाद मिळविली.  रात्री झालेल्या पालखी प्रदक्षिणेमध्ये श्री देव रामेश्‍वरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोलताशांच्या गजरात झालेल्या अभंगामध्ये युवा मंडळींनी टाळांसह फेर धरला. नयनरम्य अशा पालखी सोहळ्यात भाविक दंग झाले होते.