Tue, Jul 16, 2019 11:36होमपेज › Konkan › रत्नागिरीतूनही हापूस मुंबईला रवाना

रत्नागिरीतूनही हापूस मुंबईला रवाना

Published On: Jan 26 2018 12:26AM | Last Updated: Jan 25 2018 11:52PMरत्नागिरी : प्रतिनिधी

दापोलीपाठोपाठ रत्नागिरी तालुक्यातील हापूस वाशी मार्केटमध्ये दाखल झाला आहे. रत्नागिरीतील दांडेआडोम येथील कुमार चाळके यांच्या बागेतून सात पेट्या वाशीत पाठविल्या असून येत्या काही दिवसांत चाळीस पेट्या जातील, असा अंदाज आहे. देवगडपाठोपाठ रत्नागिरी, दापोलीतूनही गेलेल्या आंब्याला दरही चांगला मिळाला आहे.

यावर्षी थंडीचा कडाका अधिक काळ राहिल्यामुळे पुन्हा मोहर येण्याचे  संकट बागायतदारांपुढे आ वासून आहे. पहिल्या टप्प्यातील पीक ओखीने पळवले तर आता पुन्हा मोहर येऊ लागल्याने फळ गळ वाढू लागली आहे. त्याचा सामना करताना बागायतदारांची त्रेधातिरपीट उडाली आहे. या परिस्थितीचा सामना करणार्‍या चाळके यांना पहिल्या टप्प्यातील उत्पादन काही प्रमाणात मिळविण्यात यश आले आहे. यावर्षीचा हंगाम उशिरा असल्यामुळे मार्च महिन्यात एकदम आंबा बाजारात दाखल होईल. त्यामुळे दर किती मिळेल याबाबत साशंकता व्यक्‍त केली जात आहे. या परिस्थितीत ऑक्टोबरला आलेल्या पहिल्या टप्प्यातील मोहराचा फायदा बागायतदारांना किफायतशीर मोबदला मिळवून देणार आहे. 

पावसाळा हंगाम लवकर संपुष्टात आल्यानंतर हापूसला चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा होती; परंतु, दिवाळीनंतर आलेल्या ओखी वादळाने आंबा बागायतदारांची तारांबळ उडाली. कोकणातील कातळावरील बागांना लवकरच पालवी फुटली.  दांडेआडोम येथील बागायतदार कुमार चाळके यांनी आपल्या बागेवर नजर ठेवत बुरशीजन्य रोगांपासून मोहर वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वेळेत औषध फवारणी करत पुढील दोन महिने त्या झाडांची जपणूक करून सध्या आंब्याची पेटी वाशीला पाठवली आहे.