Thu, Jul 18, 2019 02:04होमपेज › Konkan › टेन्शन, उत्सुकता संपली... बारावी परीक्षेस प्रारंभ

टेन्शन, उत्सुकता संपली... बारावी परीक्षेस प्रारंभ

Published On: Feb 22 2018 1:25AM | Last Updated: Feb 21 2018 10:55PMरत्नागिरी : प्रतिनिधी

वर्षभराचा अभ्यास, परीक्षेची उत्सुकता, काहीसा ताण अशा संमिश्र वातावरणात बुधवार दि. 21 रोजी बारावीच्या विद्यार्थ्यांनी पहिला पेपर दिला. परीक्षा केंद्रावरील परीक्षा क्रमांक शोधण्यापासून ते परीक्षागृहात जाण्यापर्यंतचा तणाव विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. मित्र-मैत्रिणींना ‘बेस्ट ऑफ लक’ अशा शुभेच्छा देत बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली. 

बारावी परीक्षेमुळे सकाळी दहा वाजल्यापासूनच परीक्षेच्या केंद्राबाहेरील परिसर गर्दीने गजबजलेला पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांसोबत आलेले काही पालक दुपारी दोन वाजेपर्यंत केंद्राच्या बाहेर थांबून राहिले. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (एसएससी बोर्ड) घेण्यात येणार्‍या बारावी परीक्षेला या वर्षी कोकण बोर्डातून 33 हजार 647 विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. 60 केंद्रांवर ही परीक्षा होत आहे.

सकाळी साडेदहा वाजता पहिल्या पेपरची घंटा वाजली आणि केंद्राबाहेर थांबलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांच्या चेहर्‍यावर परीक्षेबाबतची उत्सुकता ताणली होती. ज्या विद्यार्थ्यांचा क्रमांक बाहेरच्या केंद्रावर पडला होता त्या विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर परीक्षेचा ताण अधिक जाणवत होता. विद्यार्थी पालकांसोबत सकाळी दहा वाजताच केंद्रात उपस्थित होते. केंद्राच्या बाहेर लावण्यात आलेल्या फलकावर परीक्षा क्रमांक आणि त्याची वर्गखोली यांचा तपशील लिहिण्यात आला होता. त्यामुळे आपला नंबर कुठल्या वर्गात आहे हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली.

भरारी पथके तैनात
कॉपीमुक्‍त परीक्षा मोहीम राबवण्यासाठी यंदा सहा भरारी पथकांची रचना काटेकोर करण्यात आली आहे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांना अधिकाधिक ताणमुक्‍त वातावरण मिळावे, यासाठी बोर्डातर्फे अधिकृत समुपदेशकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. पहिला पेपर शांततेत पार पडल्याचे कोकण बोर्डाचे सचिव डॉ. रमेश गिरी यांनी सांगितले.