Sun, Apr 21, 2019 01:59होमपेज › Konkan › संघ घडवतोय हिंदू राष्ट्र : मोहन भागवत 

संघ घडवतोय हिंदू राष्ट्र : मोहन भागवत 

Published On: Jul 28 2018 1:34AM | Last Updated: Jul 27 2018 11:27PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

हिंदू समाज संघटित झाला पाहिजे. संतांकडून हे काम होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तेच हिंदू राष्ट्र घडवण्याचे काम करत आहे. त्यामुळे संघ आणि संतांचे काम या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नाणीज येथील जगद‍्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानने आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमासाठी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

राष्ट्रहित कार्यामुळे संघ ही मोठी शक्‍ती असल्याने संघाकडून होणार्‍या उपक्रमांची देशासह विदेशांतही चर्चा होते. संघाकडे ज्याचा जसा बघण्याचा द‍ृष्टिकोन असेल त्याप्रमाणे चर्चा केली जाते. संघशक्‍तीला मानणारे लोक संघाच्या कार्याची स्तुती करतात. त्याचवेळी संघाची शक्‍ती ज्याला अनुकूल नाही ते संघावर टीका करतात, अशा शब्दांत डॉ. भागवत यांनी विरोधकांवर आसूड ओढले.

नाणीज येथील जगद‍्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानने गुरूपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सरसंघचालकांसह नरेंद्रचार्य महाराज, कानिफनाथ महाराज, उल्हास घोसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. सरसंघचालकांच्या उत्तम कार्याबद्दल मानपत्र व पाच लाख रूपये देऊन त्यांना गौरविण्यात आले. डॉ. भागवत यांनी पाच लाखांची रोख रक्‍कम पुन्हा नरेंद्र महाराज संस्थानला देऊन या रकमेचा समाजकार्यासाठी वापर व्हावा, अशी इच्छा व्यक्‍त केली.

संतांप्रमाणेच संघानेही आपले काम सुरू ठेवले आहे. संघाचे काम संतांना तातडीने कळते. कारण संतांना माणसे लवकर कळतात, अशा शब्दांत सरसंघचालकांनी संघाकडून होत असलेल्या उपक्रमांचे समर्थन केले. पवित्र हिंदू राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी संघ प्रयत्नशील आहे. समाजाची सेवा का करावी लागते याचे कारण केवळ हिंदू राष्ट्रच सांगू शकते. कारण हिंदू राष्ट्राला संतांची परंपरा आहे, असेही यावेळी डॉ. भागवत यांनी सांगितले.

हिंदू समाज संघटित करण्याचे काम संघाकडून सुरू आहे. परंपरा, संस्कृती, धर्म यासाठी संघ कार्यरत आहे. त्यामुळे या कार्याची सर्वच स्तरातून स्तुती होते. मात्र, संतांकडून पाठ थोपटली गेली की वेगळाच आनंद असतो, असेही सरसंघचालकांनी सांगून यातून घरातल्या व्यक्‍तीने शाबासकी दिल्याप्रमाणे आनंद वाटत असल्याचे म्हटले. संघ ही एक मोठी शक्‍ती आहे. संघाच्या शक्‍तीला अनुकूल असणारी मंडळी संघ कार्याची स्तुती करते. मात्र, ज्याला संघ अनुकूल वाटत नाही ते संघावर टीका करतात, असे स्पष्ट मत व्यक्‍त केले.