Sun, Oct 20, 2019 01:57होमपेज › Konkan › शिराळेची ४०० वर्षांची अनोखी 'गावपळण' परंपरा

शिराळेची ४०० वर्षांची अनोखी 'गावपळण' परंपरा

Published On: Jan 02 2018 1:09AM | Last Updated: Jan 01 2018 10:18PM

बुकमार्क करा
वैभववाडी : प्रतिनिधी 

शिराळे गावची पारंपरिक गावपळण सोमवारपासून सुरू झाली आहे.  सुमारे 350 ते 400 वर्षांची परंपरा शिराळेवासीय आजही मोठ्या भक्तिभावाने व श्रद्धेने पाळत आहेत.  गावापासून सुमारे 3 ते 4 कि.मी. अंतरावर सडुरे गावच्या हद्दीत दौंडोबा डोंगराच्या पायथ्याशी येथील ग्रामस्थांनी आपला संसार थाटला आहे.  या गावपळणीत गावातील अबालवृद्ध, आपल्या गुराढोरांसह कोंबड्या, कुत्र्यासह  गावकरी किमान तीन दिवस याठिकाणी उभारलेल्या झोपड्यांमध्ये वास्तव्य करणार आहेत. इतकेच नव्हे तर तीन दिवस येथील प्राथमिक शाळाही या गावपळणी जवळच झाडाखाली भरते. या तीन दिवसांतील ग्रामस्थांचा निसर्गाच्या सान्निध्यात राहत एक वेगळाच आनंद अनुभवतात.

वैभववाडीपासून सुमारे 15 कि.मी. अंतरावर शिराळे हे सुमारे 300 ते 350 लोकवस्ती असलेले छोटसं सह्याद्रीच्या कुशीत वसलेले निसर्गसौंदर्याने  नटलेले गाव.दरवर्षी पौष महिन्यात ही गावपळण होते. या गाळपळणीबाबत अनेक अख्यायिकाही सांगितल्या जातात.  पौष महिन्यात गावचे ग्रामदैवत श्री गांगेश्‍वराला ग्रामस्थ कौल लावतात व कौल दिल्यानंतर ग्रामस्थ गावपळण करतात. साधारण पाच ते सात दिवस ही गावपळण पाळली जाते.  दरम्यानच्या काळात गावात कोणीही ग्रामस्थ फिरकत नाही. पाचव्या दिवशी कौल घेतल्यानंतर ग्रामदैवताच्या हुकुमाने ग्रामस्थ परत गावात फिरतात. या गावपळणीत वयोवृ ग्रामस्थांपासून नवजात बालकांनाही आणले जाते.  सध्या कडाक्याची थंडी असूनही या थंडी वार्‍याची कशाचीही परवा न करता मोठ्या भक्तिभावाने या गावपळणीमध्ये ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.  

झाडांच्या टाळ्यापासून याठिकाणी 35 झोपड्या ग्रामस्थांनी उभारल्या आहेत.   या झोपड्यासमोरच आपापल्या गुरांना बांधण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणापासून जवळच असलेल्या सुखनदीच्या पात्रातील झर्‍याचे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येते. गावकरी खेळीमेळीत निसर्गाच्या सान्निध्यात गप्पागोष्टी करत आनंदाने घालवतात.