Thu, Jun 27, 2019 13:40होमपेज › Konkan › गुहागरात १,१५४ हेक्टरवर लागवड होणार  

गुहागरात १,१५४ हेक्टरवर लागवड होणार  

Published On: Jun 09 2018 1:35AM | Last Updated: Jun 08 2018 8:41PMशृंगारतळी : वार्ताहर

महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतल्यानंतर गतवर्षी प्रत्येक विभागाला फळबाग लागवडीचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले. मात्र, ते पूर्ण करण्यामध्ये हा विभाग अपयशी ठरला. त्यामुळे गतवर्षीचा गोंधळ लक्षात घेता यावर्षी लागवडीसाठी नवीन नियम जारी केला आहे. तालुक्यात 1,154 हे. क्षेत्रावर फळझाड लागवडीचे उद्दीष्ट आहे.

महात्मा गांधी ग्राम रोजगार हमी योजनेंतर्गत यावर्षी तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती कृषी अधिकारी शासनाचे वनखाते व सामाजिक वनीकरण यांना वृक्षलागवडीचे उद्दीष्ट देऊन त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. तालुका कृषी व पंचायत समिती यांना 1154 हेक्टर क्षेत्राचे उद्दीष्ट देण्यात आले असून त्यातून 2 लाख 30 हजार 800 काजू रोपे, 1 लाख 15 हजार 400 आंबा अश्या रोपांची लागवड केली जाणार आहे. 

गेल्यावर्षी लाभार्थी निवड व कागदपत्रे लांबणीवर पडल्याने 100 टक्के उद्दीष्ट साध्य झाले नाही. त्यामुळे गतवर्षीचे शिल्लक राहिलेले क्षेत्र व यावर्षीचे क्षेत्र यावर लागवड पूर्ण करावयाची आहे. पं. स.कृषी विभागाच्या वतीने 65 ग्रा.पं.मध्ये प्रत्येक गावाला 5 हेक्टर क्षेत्र देण्यात आले असून गेल्या वर्षी शिल्लक 225 हेक्टर क्षेत्र व या वर्षीचे 325 हेक्टर क्षेत्र मिळून पं.स. ला यावर्षी 550 हेक्टर लागवड करावी लागणार आहे. शासनाच्या तालुका कृषी अधिकार्‍यांच्या कार्यालयाचे गतवर्षीचे 204 हेक्टर क्षेत्र लागवडीचे शिल्लक असून या वर्षी नवीन 400 हेक्टर मिळून 604 हेक्टरवर फळबाग लागवड होणार आहे. 

गेल्या वर्षी अधिकार्‍यांनी शासनाच्या फळरोपवाटीका असलेल्या चिपळूण येथील मुंढे व दापोली विद्यापीठ येथून फळरोपे आणली. परंतु ती अत्यंत निकृष्ट व निर्जीव होती. त्यामुळे लावलेल्या रोपांपैकी किती जगली याचा अहवाल अद्याप घेतलेला नाही. म्हणूनच या वर्षी मंजूर झालेल्या क्षेत्रातील लागवडीसाठी लागणारी फळरोपे शेतकरी लाभार्थ्यांनी स्वतः खरेदी करावयाची आहेत.