Thu, Jun 27, 2019 09:48होमपेज › Konkan ›

कणकवलीला निधी कमी पडू देणार नाही : ना. केसरकर
 

कणकवलीला निधी कमी पडू देणार नाही : ना. केसरकर
 

Published On: Apr 05 2018 2:12AM | Last Updated: Apr 05 2018 12:17AMकणकवली : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी राज्याचा अर्थ राज्यमंत्री या नात्याने विविध योजनांमधून भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. कणकवलीच्या विकासासाठीही निधी कमी पडू देणार नाही. मुडेडोंगरी येथील मैदान, सुसज्ज गार्डन, मल्टीपर्पज हॉल, ड्रेनेज सिस्टीम अशी कामे वेगाने केली जातील. शिवसेना-भाजप युतीचे नेते आम्ही एकत्रितपणे कणकवलीचा विकास करू. संदेश पारकर व युतीच्या उमेदवारांचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे दोन्ही नेते येतील, असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

कणकवली न.पं.तील भाजप-शिवसेना युतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर व युतीच्या नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी सायंकाळी येथील सह्याद्री हॉटेल समोर युतीची जाहीर प्रचार सभा झाली. या सभेला ना. दीपक केसरकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खा.विनायक राऊत, आ. वैभव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, युवा नेते संदेश पारकर, प्रदेश चिटणीस राजन तेली, अतुल रावराणे, जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, शिवसेना कणकवली संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर, सौ. राजश्री धुमाळे, स्नेहा तेंडुलकर यांच्यासह शिवसेना भाजप युतीचे पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते.

ना. दीपक केसरकर म्हणाले, राणेंच्या तुलनेत आपण पालकमंत्री असताना गेल्या साडेतीन वर्षांत अधिकचा निधी सिंधुदुर्गच्या विकासासाठी आणला आहे. विकास आपोआप होत नसतो त्यासाठी पैसे आणावे लागतात. सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळेल. कोकणची जनता ही शांत आणि प्रेमळ आहे. कोकणवासीयांना प्रेमाने होणारा विकास हवा आहे. कणकवलीच्या विकासासाठी संदेश पारकर आणि वैभव नाईक यांना आम्ही एकत्र आणले. त्यामुळे खर्‍या अर्थाने कणकवलीला वैभवाचा संदेश मिळाला आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणावर जिल्ह्याच्या विकासासाठी निधी आणत आहोत मात्र तो जनतेच्या कल्याणासाठी खर्च व्हायला हवे. संदेश पारकर आणि त्यांची टीम खरोखरच कणकवलीचा सर्वांगीण विकास करतील यात शंका नाही.  

कोकणचे नेते म्हणविणार्‍यांकडून भ्रमनिरास : ना.रवींद्र चव्हाण

मोठी पदे भुषविलेले आणि स्वत:ला कोकणचे नेते म्हणविणार्‍यांनी कोकणचा काहीच विकास केला नाही. मात्र आमच्या मुख्यमंत्र्यांनी खर्‍या अर्थाने या राज्याच्या विकासाचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत संवेदनशीलपणे लोकाभिमूख निर्णय घेतले. त्यामुळेच अलिकडच्या सर्व नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप, सेनेचे सर्वाधिक उमेदवार विजयी झाले.  आज केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आहे. या सत्तेच्या माध्यमातून कणकवली शहरात विकासाची गंगा येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी संदेश पारकर यांच्यारूपाने युतीच्या हातात सत्ता द्या, आपण कणकवलीच्या विकासासाठी शहर दत्तक घेईल अशी ग्वाही दिली आहे, असे ना.चव्हाण म्हणाले.

राणेंनी स्वत:चेच व्यवसाय वाढवले : खा. राऊत

खा.विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली. काल भाजपच्या खासदारकीची शपथ घेतलेले राणे आज स्वाभिमानचा प्रचार करत आहेत, ते कणकवलीचा विकास काय करणार? कोकणच्या विकासाच्या नावाखाली त्यांनी स्वत:चे व्यवसाय वाढवले. त्यांनी केलेली कर्मे कणकवलीकर विसरलेले नाहीत. होय, आम्हीच कणकवलीचा विकास करणार आहोत आणि जनतेचा आमच्यावर विश्‍वास आहे हे गेल्या तीन-चार वर्षात भाजप-सेना सरकारने दाखवून दिले आहे. संदेश पारकर आणि त्यांची टीम युतीच्या नेत्यांच्या सहकार्याने कणकवलीचा सर्वांगीण विकास करेल असा विश्‍वास खा.राऊत यांनी व्यक्त केला. आ.वैभव नाईक यांनी युती सरकारच्या काळात जिल्ह्यातील न.पं.ना भरीव निधी मिळाला. कणकवलीलाही भरीव निधी मिळेल अशी ग्वाही दिली. यावेळी राजन तेली, अतुल रावराणे, जान्हवी सावंत यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन  करताना प्रमोद जठार यांनी केंद्रात, राज्यात सत्ता असताना कणकवलीतही सत्ता यावी जेणेकरून  विकास होईल, असे म्हणाले.