Mon, Jun 17, 2019 04:22होमपेज › Konkan › पालकमंत्र्यांनी १० लाख रुपये भरून विमान उतरवले : नारायण राणे

पालकमंत्र्यांनी १० लाख रुपये भरून विमान उतरवले : नारायण राणे

Published On: Sep 13 2018 1:45AM | Last Updated: Sep 12 2018 9:52PMकुडाळ : शहर वार्ताहर

चिपी विमानतळावर विमान उतरविण्यासह आवश्यक परवानग्या अद्याप मिळालेल्या नाहीत, तरी देखील पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केवळ स्वतःच्या प्रेस्टीजसाठी  बुधवारी  मुंबईतुन 10 लाख रू. भरून भाडेतत्वावर खासगी विमान बेकायदेशीरित्या उतरविले, असा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा. नारायण राणे यांनी केला.

कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत खा. राणे बोलत होते. आ. नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जि.प.उपाध्यक्ष रणजित देसाई, तालुकाध्यक्ष दीपक नारकर, अशोक सावंत,संजू परब आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

खा. राणे म्हणाले, पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यात विमानतळ व्हावा यासाठी मी प्रयत्न केले. जागा निवडून रितसर परवानग्याही घेतल्या. त्यानंतर राज्य सरकारच्या एमआयडीसीने विमानतळाचे काम वीरेंद्र म्हसकर यांच्या कंपनीला दिले. 2014 पर्यंत विमानतळाचे बांधकाम, धावपट्टी संबंधी बरेचसे काम पूर्णत्वास गेले होते. मात्र, मागील 4 वर्षांत हे विमानतळ सुरू व्हावे यासाठी पालकमंत्री केसरकर यांनी कोणताही प्रयत्न केलेला नाही. विमानतळ, सी वर्ल्ड, रेडी बंदर रद्द होऊ नये यासाठी सातत्याने मी प्रयत्न केला. विमानतळ सुरू होणार असे दिसताच ना. केसरकर यांनी केवळ श्रेयासाठी व हट्टासाठी बेकायदेशीरपणे विमान लँडिंगचा अट्टाहास केला, असा आरोप खा. राणे यांनी केला. 

खा. राणे म्हणाले, गोवा येथे इंटरनॅशनल विमानतळ होत असल्याने चिपी येथे डोमॅस्टीक विमानतळ होत आहे. या विमानतळासाठी मी 3400 मीटर एवढ्या लांबीची धावपट्टी ठेवली होती, मात्र या सरकारने ती 900 मीटर ने कमी करून 2500 मीटरवर आणली. शिवाय हे विमानतळ रद्द करण्याचीही तयारी या सरकारची होती. मात्र मी या विमानतळासाठी निधी देण्यास सरकारला भाग पाडले. असा दावा त्यांनी केला.  विमानतळ सुरू होण्यासाठी एकूण 62 प्रकारच्या परवानग्या घ्यावा  लागतात मात्र सदर कंपनीने आतापर्यंत त्यातील जेमतेम 20 परवानग्या मिळविल्या आहेत. डिजीसीए सह उर्वरीत परवानग्या अद्याप मिळालेल्या नाहीत.  ना. केसरकरांनी मुंबईतील ‘वादवा ’  बिल्डरच्या विमानाकरीता 10 लाख रूपये भाडे भरल्याचा दावा त्यांनी केला. पायलट व्यतिरीक्‍त या  विमानात अन्य कोणीही नव्हते.याकडे त्यांनी लक्ष वेधले. केवळ गोवा ते मुंबई विमान प्रवास करायचे सोडुन ना. केसरकरांना  विमानतळाबाबत काय कळते? असा उपहासात्मक सवाल त्यांनी केला.

हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी 12 सप्टेंबर रोजी चाचणी घेतली जाईल त्यावेळी तुम्हालाही तिथे सोबत घेऊन जाईन असे मला सांगितले होते. मात्र, या कंपनीने आवश्यक परवानग्या न काढल्याने ही चाचणी होऊ शकली नाही. हा बेकायदेशीर कार्यक्रम असल्याने  ना. प्रभू व मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो नाही. आवश्यक सर्व परवानग्यांसह रस्ते, वीज, पाणी, दूरध्वनी सुविधा निर्माण विमानतळ रितसर सुरू व्हावे अशी आपली इच्छा आहे.  त्यावेळी आम्ही न बोलवताही उपस्थित राहू तसेच उद्घाटनाचा सर्व खर्चही करू, असे खा.  राणे  म्हणाले.