होमपेज › Konkan › चिपी प्रकल्पग्रस्तांनी नोकरीसाठी अर्ज द्यावेत : ना. केसरकर

चिपी प्रकल्पग्रस्तांनी नोकरीसाठी अर्ज द्यावेत : ना. केसरकर

Published On: Aug 07 2018 1:00AM | Last Updated: Aug 06 2018 10:52PMओरोस : प्रतिनिधी

चिपी विमानतळासाठी चिपी व परुळे ग्रामपंचायत हद्दीत जमिनींचे भूसंपादन झाले आहे. या दोन्ही गावातील ज्या कुटुंबांच्या जमिनींचे भूसंपादन झाले आहे अशा प्रकल्पग्रस्त कुटुंबातील इच्छुक व्यक्‍तींनी नोकरी मिळण्याबाबतचे अर्ज आपल्या शैक्षणिक अर्हतेसह व सोबत जमिनीचा 7/12 उतारा जोडून संबंधित ग्रामपंचायतींमध्ये द्यावेत. पात्र व्यक्‍तींना नोकरी देण्याबाबत आय. आर. बी. कंपनीमार्फत कार्यवाही केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी  चिपी विमानतळ कामाच्या आढावा बैठकीत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात सोमवारी आय. आर. बी. कंपनीचे वरिष्ठ आधिकारी,  सा. बां. विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, लघुपाटबंधारे विभाग, महावितरण आदी अधिकार्‍यां बरोबर आयोजित बैठकीत ना. केसरकर यांनी विमानतळ कामांचा सविस्तर आढावा घेतला. आ. वैभव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षितकुमार गेडाम, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी एच.टी. जगताप उपस्थित होते.

चिपी विमानतळासाठी तात्पुरता पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी पाट तलावापासून लाईन टाकण्याचे संयुक्‍त सर्वेक्षण करावे, सार्वजनिक बांधकाम विभागाने चिपी गावाकडे जाणारा रस्ता, परुळे गावातून विमानतळाकडे येणार्‍या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम आठ दिवसांत सुरू करावे. 

परुळे गाव ते विमानतळ बी.एस.एन.एल. केबल टाकण्याचे काम त्वरित पूर्ण करावे. वीज कंपनीने कायमस्वरुपी वीजपुरवठा व्हावा या दृष्टीकोनातून आय. आर. बी. कंपनीच्या अधिकार्‍यांसमवेत चर्चा करुन कार्यवाही सुरू करावी, आदी सूचना या बैठकीत पालकमंत्री केसरकर यांनी दिल्या.