Mon, Jan 27, 2020 11:25होमपेज › Konkan › ग्रामीण रस्ते सुधारल्यास विकासाला गती : रवींद्र वायकर 

ग्रामीण रस्ते सुधारल्यास विकासाला गती : रवींद्र वायकर 

Published On: Dec 10 2018 1:11AM | Last Updated: Dec 10 2018 1:11AM
आरवली  : वार्ताहर

ग्रामीण भागातील रस्ते सुधारले की विकासाला गती येईल. शासनाच्या माध्यमातून गावागावातील रस्ते सुधारण्यावर आपला भर असून पालकमंत्री या नात्याने खेडोपाड्यातील विकासासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले. संगमेश्‍वर तालुक्यातील मासरंग रस्त्याचे भूमिपूजन शनिवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

कार्यक्रमाला आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक, जि. प. शिक्षण व अर्थ सभापती सहदेव बेटकर, जि. प. सदस्य संतोष थेराडे, पं.स. सभापती सोनाली निकम, तहसीलदार संदीप कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी पालकमंत्री म्हणाले की, राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यन्वित केल्यापासून या जिल्ह्याच्या खेडोपाड्यातील रस्ते या योजनेतून पक्के करण्यावर आपला भर राहिला आहे. गावात जाणारा रस्ता जोपर्यंत चांगला होत नाही तोपर्यंत विकासाची घोडदौड मंदावते. याच दृष्टीने गावागावाला पक्क्या रस्त्यांनी जोडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमचे जिल्हा परिषद सदस्यही त्यासाठी तत्पर असून गेल्या पाच वर्षात आम्ही केलेली कामेच आमच्या सरकारचे यश दाखवते, असा दावा त्यांनी केला. 

यावेळी जि. प. शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी पालकमंत्र्यांच्या कामाचे कौतुक करून आगामी काळातही असेच सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. आमदार सदानंद चव्हाण यांनी तालुक्यातील 100 टक्के विकासकामांचा दावा आपण पूर्ण केला असून आगामी काळातही शिल्लक समस्या मार्गी लावणार असल्याचे सांगितले.

पालकमंत्र्यांच्या या दौर्‍यादरम्यान दिवसभरात पालकमंत्र्यांच्या हस्ते कडवई-कसबा जिल्हा परिषद गटातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या अंत्रवली गवळीवाडी, शेंबवणे जुवळेवाडी, लटकेवाडी ते धामणी बडदवाडी राष्ट्रीय महामार्गापर्यंतचा रस्ता भूमिपूजन, संगमेश्‍वर गुरववाडीतील ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन, आंबेड खुर्द येथील रस्त्याचे भूमिपूजन असे विविध उपक्रम करण्यात आले.