होमपेज › Konkan › नाणार प्रकल्प होऊ देणार नाही : राणे

नाणार प्रकल्प होऊ देणार नाही : राणे

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 16 2018 11:06PMमुंबई : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यात नाणार येथे होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरीच्या विनाशकारी प्रकल्पाला आपला सुरुवातीपासूनच विरोध असून कोणत्याही परिस्थितीत कोकणात हा प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांनी दिला. नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध हे केवळ नाटक असून प्रकल्प झाल्यास कोकणात शिवसेनेच अस्तित्व शिल्लक राहणार नाही म्हणून उद्धव ठाकरे गुरुवारी मुख्यमंत्र्यांना भेटल्याची टीका राणे यांनी केली.

ग्रीन रिफायनी प्रकल्पामुळे कोकणातील आंबा, काजू, नारळ, भात या पिकांवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळेच राजापूर, देवगड येथील जवळपास 18 गावांतील लोकांनी या प्रकल्पास विरोध केला आहे. या प्रकल्पासंदर्भात यापूर्वीच आपली मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून ग्रीन रिफायनरीसारख्या विनाशकारी प्रकल्पाची एक वीटही कोकणात रचू देणार नाही, असे आपण त्यांना सांगितल्याचे राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. 

शिवसेना खासदार आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते, खा. विनायक राऊत यांनीच आंध्र पदेशातून ग्रीन रिफायनरीचा विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्रात आणला. या प्रकल्पाला स्थानिक जनतेकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत असून 95 टक्के प्रकल्पग्रस्त आपल्या सोबत आहेत. प्रकल्पाच्या विरोधात आपण बोलावलेल्या सभेला जमलेली ग्रामस्थांची गर्दी पाहून नाणार रिफायनरी प्रकल्प झाल्यास शिवसेना भुईसपाट होईल, अशी भीती उद्धव ठाकरे यांना वाटत आहे. जर खरोखरच शिवसेनेचा विरोध होता, तर उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना सांगून प्रकल्पाला देण्यात आलेल्या परवानग्या रद्द का केल्या नाहीत, असा प्रश्‍न राणे यांनी केला.

ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी संपादन करण्याचे काम उद्योग विभागाकडून सुरू आहे. पर्यावरणाच्या द‍ृष्टीने घातक असणार्‍या या प्रकल्पाला परवाने देणार्‍या खात्याचा कारभार शिवसेनेच्या मंत्र्यांकडे आहे. मग आतापर्यंत प्रकल्प का रद्द केला नाही. ग्रीन रिफायनरीसाठी मॅग्‍नेटिक महाराष्ट्रमध्ये सामंजस्य करार अग्रक्रमाने करण्यात येणार होता. शिवसेना या प्रकल्पाच्या विरोधात होती, तर यासंदर्भातील प्रस्ताव पुढे आलाच कसा, असे प्रश्‍न उपस्थितीत करत या प्रकल्पासंदर्भात शिवसेनेची भूमिका एकंदर दुटप्पी असल्याचे राणे म्हणाले.