Wed, Mar 20, 2019 08:32होमपेज › Konkan › रामेश्‍वर ग्रामस्थांचाही ग्रीन रिफायनरीला कडाडून विरोध

रामेश्‍वर ग्रामस्थांचाही ग्रीन रिफायनरीला कडाडून विरोध

Published On: Dec 23 2017 2:06AM | Last Updated: Dec 22 2017 10:39PM

बुकमार्क करा

विजयदुर्ग : वार्ताहर

ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत शुक्रवारी दुसर्‍या दिवशी झालेल्या सुनावणीवेळी रामेश्‍वर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवित जमीन संपादनास व प्रकल्पास लेखी हरकतीद्वारे तीव्र विरोध दर्शविला.

गिर्ये प्रमाणेच रामेश्‍वर भागातील ग्रामस्थांना जमीन संपादनाबाबत नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.या भागातील मोठ्या प्रमाणात जमीन,घरे,आंबा बागा भूसंपादनात जात असल्याने तसेच हा प्रकल्प प्रदूषणकारी असल्याचा दावा करत नागरिकांनी आपला या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला. 

शुक्रवारी देवगड तहसील कार्यालयात कणकवलीच्या प्रांताधिकारी नीता शींदे व देवगड तहसीलदार वनीता पाटील यांच्या उपस्थितीत रामेश्‍वर ग्रामस्थांच्या हरकती नोंदवून घेण्यात आल्या. यावेळी 677 भूधारकांपैकी  558 भूधारकांनी  हरकती नोंदविल्या. कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारची माहिती ऐकण्याची तयारी ग्रामस्थांची नसल्याने कंपनीच्या लोकांनी ग्रामस्थांसमोर येणे तसेच पत्रक वाटणे टाळले. या प्रकल्पासाठी आमची एक इंचही जागा देणार नाही.

प्रकल्पाला आमचा कायम विरोध राहील, असा इशारा रामेश्‍वर येथील उपस्थित महिला वर्गांनीही दिला. प्रकल्पाविरोधात महिलांनीही आपली एकजूट दाखविली. माजी उपसभापती नासीर मुकादम,  मुनाफ ठाकूर, सुरेश केळकर या प्रकल्पविरोधी संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी माध्यमांसमोर प्रकल्पविरोधाची भूमिका मांडून मरेपर्यंत या प्रकल्पाला आमचा विरोधच राहील असे स्पष्ट केले.येत्या काही दिवसात या प्रकल्पाविरोधात गिर्ये-रामेश्‍वर भागातील नागरिकांचा मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात येणार असल्याचे संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी सांगितले.

या सुनावणीवेळीही चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.देवगड पोलिस निरिक्षक जयकुमार सूर्यवंशी, विजयदुर्ग पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासहीत 40 हून अधिक पोलिस कर्मचार्‍यांचा बंदोबस्तासाठी ताफा होता.