Sun, Jul 21, 2019 02:03होमपेज › Konkan › ‘नाणार’बाबत शिवसेना दुटप्पी 

‘नाणार’बाबत शिवसेना दुटप्पी 

Published On: Mar 04 2018 1:42AM | Last Updated: Mar 03 2018 10:51PMचिपळूण : प्रतिनिधी

नाणार येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकरणात विधिमंडळात उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या प्रकल्पाचे केलेले समर्थन तसेच आंदोलनाची उडवलेली खिल्ली यामुळे शिवसेनेची दुटप्पी भूमिका स्पष्टपणे जनतेसमोर आली आहे. शिवसेना कोकणाबरोबर येथील जनतेशी कपटनीती व सुडाचे राजकारण खेळत असल्याचा जोरदार हल्लाबोल माजी खासदार व ‘महाराष्ट्र स्वाभिमान’चे सरचिटणीस नीलेश राणे यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना  शिवसेनेवर केला.

कोणतीही किंमत मोजू; परंतु नाणारची रिफायनरी होऊ देणार नाही, अशी सुरुवातीलाच स्पष्ट भूमिका नीलेश राणे यांनी पत्रकारांसमोर मांडली. राजकारण बाजूला राहू दे, परंतु कोकणी जनतेच्या व कोकण विकासाच्या मुळावर येणार्‍यांना उखडून फेकू, असा हल्लाबोल करतानाच नीलेश राणे पुढे म्हणाले की, शिवसेनेने नाणार रिफायनरीच्या विरोधात भूमिका घेतली असली तरी ती बोटचेपी आहे. जनतेची दिशाभूल करणारी आहे. मुळात हा प्रकल्पच खासदार विनायक राऊत व अनंत गीते यांनीच या भागावर लादला आहे व हे स्वत: मुख्यमंत्र्यांनीच उघड केले आहे.

त्यानंतर यांनी लोकांचा विरोध लक्षात घेता शिवसेनेचाही नाणारला विरोध असल्याची भाषा सुरू केली. उद्धव ठाकरेही मुख्यमंत्र्यांना भेटले. परंतु, हा सगळा दिखाऊपणा होता. हे उद्योगमंत्री व शिवसेना नेते व विधिमंडळातील स्पष्ट झाले आहे. एकीकडे शिवसेनेचे आमदार प्रकल्प होणार नाही, अशा घोषणा करतात, दुसरीकडे उद्योगमंत्री प्रकल्पाला स्थानिकांचा विरोधच नाही, असे विधिमंडळात बोलतोच कसा? हे केवळ राजकीय सेटिंग आहे आणि यामध्ये शिवसेना पूर्णपणे अडकली आहे. नाणार प्रकल्प रद्द करण्याची शिवसेनेमध्ये हिंमतच नाही. या 50 गावांतील जनतेनेही शिवसेनेच्या नीतीला आता चांगलेच ओळखले असून यापुढे सेनेवाल्यांना या भागात थाराही मिळणार नाही, असा जनतेनेच निर्धार केल्याचे नीलेश राणे यांनी सांगितले.

प्रकल्प रद्द करण्याची धमक सेनेत नाही

नाणार प्रकल्प रद्द करण्याची सेनेत धमक नाही. त्यामुळे सेनेने स्थानिकांची दिशाभूल करण्याचा प्रकार थांबवावा. नारायण राणे यांच्यानंतर सेनेने कोकणचा काय विकास साधला हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष नाणारला कोणत्याही किमतीवर थारा देणार नाही. यासाठी राजकीय किंमतही मोजू. पण, नाणार प्रकल्पग्रस्तांच्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही. प्रत्येक पावलागणिक आम्ही नाणारवासीयांच्या सोबत आहोत, असे ठोस प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.