Wed, Apr 24, 2019 21:27होमपेज › Konkan › स्वप्नपूर्तीचा मोठा आनंद : खा. नारायण राणे

स्वप्नपूर्तीचा मोठा आनंद : खा. नारायण राणे

Published On: May 24 2018 10:30PM | Last Updated: May 24 2018 10:22PMसिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी

माझे वडील आजारी असले की सिंधुदुर्गात वैद्यकीय सुविधा नसल्याने त्यांना वारंवार उपचारासाठी मुंबईला न्यावे लागत असे, त्याचप्रमाणे येथील नागरिकांना उपचारासाठी गोवा, मुंबई, कोल्हापूर आदी ठिकाणी न्यावे लागते. यात बर्‍याचवेळा वाटेतच एखाद्याला आपल्या प्रणाला मुकावे लागते ही स्थिती मी बघायचो. त्याचवेळी मी माझ्या मनात जिल्ह्यात जिल्हावासीयांच्या आरोग्याची काळजी घेणारे एक अद्ययावत असे रुग्णालय करायचे असे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न आज पूर्ण होत आहे याचे आपल्याला समाधान आहे. असे सांगतानाच याठिकाणी केवळ माणुसकी हाच धर्म असेल बाकी जात, पात, पक्ष असले भेदभाव नसतील. केवळ येथे येणारा रुग्ण ठणठणीत बरा होऊन जाणे हेच आमचे ध्येय आहे. यासाठी या रुग्णालयात केवळ 10 रुपये ओपीडीसाठी तर 350 रुपयांत डायलेसिस अशा माफक आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडणार्‍या दरात उपचार केले जाणार आहेत. अशा लाईफटाईम रुग्णालयाचे 27 मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होत असल्याचे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खा. नारायण राणे यानी पडवे येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून आपण पडवे येथे 82 एकर जागेत उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचे उद्घाटन 27 मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, मंत्री गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे व अन्य मंत्री तसेच राज्यातील प्रसिद्ध व सर्व प्रकारचे तज्ञ डॉक्टर व उद्योजक उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती देण्यासाठी गुरुवारी पडवे येथे लाईफटाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
     कोकण व महाराष्ट्रातील जनतेला अद्ययावत सेवा या रुग्णालयातून मिळावी यासाठी जागतिक पातळीवरील सर्व रोगावरील अद्ययावत मशिनरी उपलब्ध करण्यात आली आहे. सर्व रोगांवर उपचार येथे होणार आहेत. यावेळी आ. नितेश राणे, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. आर. एस. कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी आशा भोगले, संदीप कुडतडकर, अशोक सावंत, विकास कुडाळकर, कुडाळ तालुका स्वाभिमान अध्यक्ष दीपक नारकर आदी उपस्थित होते.

हॉस्पिटलचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यातील 300 बेडच्या हॉस्पिटलचे उद्घाटन 27 मे रोजी होत आहे. जागतिक कीर्तीचे हे हॉस्पिटल होईल, असा विश्‍वास यावेळी खा. राणे यांनी व्यक्‍त केला. 
मेडिकल टुरिझमसाठी प्रयत्न

लाईफटाईम हॉस्पिटलचा उपयोग मेडिकल टुरिझमसाठी करणार आहे. ज्या देशात मेडिकल टुरिझमची सुविधा नाही त्या देशाशी बोलणी सुरु आहेत. तेथील रुग्ण विमानाने आणून येथे त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. चिपी विमानतळाचे काम जूनमध्ये पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे. सध्यातरी आम्ही गोवा विमानतळावरून रुग्ण आणण्याचे नियोजन केले आहे. चिपी विमानतळ सुरु झाल्यावर मेडिकल टुरिझमचे रुग्ण येथे आणण्यास सोईस्कर होणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात एक रुग्णवाहिका तेथील रुग्ण आणण्यासाठी ठेवणार आहोत. तसेच दोन वातानुकूलित रुग्णवाहिका ठेवणार आहोत, असेही खा. राणे यांनी सांगितले. 

लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये 11 क्लासिकल विभाग आहेत. 7 सुपर स्पेशालिस्ट उपचार कक्ष आहेत. 32 पूर्णवेळ डॉक्टर नियुक्‍त करण्यात आले आहेत. तसेच देश-विदेशातील 45 व्हिजिटिंग कन्सल्टिंग डॉक्टर नियुक्‍त करण्यात आले आहेत. स्वतंत्र अपघात विभाग असून त्यालाच लागून ऑपरेशन विभाग आहे. तो वातानुकूलित आहे. एकूण 6 वातानुकूलित विभाग आहेत. 12 ऑपरेशन थिएटर्स आहेत. दुर्मिळ प्रमाणात उपलब्ध असणारी किडनी ट्रान्सफरन्स युनिट बसविण्यात आले आहे. मेडिकल डिपार्टमेंट स्वतंत्र आहे. औषधेही माफक दरात उपलब्ध करण्यात आली आहेत. डॉक्टरांसाठी 68 कक्ष करण्यात आले आहेत. स्टोन व किडनी उपचारासाठी अद्ययावत मशीन बसविण्यात आलेली आहे. गरोदर मातेच्या गर्भातील बाळ कसे आहे पाहण्यासाठी थ्रीजी व फोरजी यु एस बी बसविण्यात आलेली आहे. अत्यंत अद्ययावत अशी एमआरए मशीन बसविण्यात आलेली आहे, अशी माहिती यावेळी खा. नारायण राणे यांनी दिली.