Thu, Mar 21, 2019 23:22
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › कृषी अभियांत्रिकी योजनेत ‘ग्रास कटर’चा समावेश

कृषी अभियांत्रिकी योजनेत ‘ग्रास कटर’चा समावेश

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 16 2017 8:23PM

बुकमार्क करा

राजापूर : प्रतिनिधी

कोकणातील शेतकर्‍यांना उपयुक्त ठरणार्‍या ग्रास कटर या कृषी अवजाराचा कृषी अभियांत्रिकी उपअभियान योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदार आ. हुस्नबानू खलिफे यांनी दिली. कोकणात मोठ्या प्रमाणात भातशेती आणि फळबाग लागवड केली जाते. 

कोकणात पाऊसही मोठ्या प्रमाणात होत असल्याने बागायती तसेच शेतामध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगवते. हे गवत सुकल्यानंतर वणवा लागून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होण्याचा धोका असतो. त्यामुळे गवत कापण्यासाठी ग्रास कटर हे उपकरण शेतकरी, बागायतदारांसाठी फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे शासनाच्या कृषी अभियांत्रिकी उपअभियान योजनेमध्ये ग्रासकटर या अवजाराचा समावेश करावा, अशी मागणी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी कृषी, फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. तसेच ग्रासकटरच्या किमतीवरील शासकीय अनुदानाच्या रकमेत वाढ करावी, ग्रास कटर मागणीकरिता मार्च 2018 पर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी खलिफे यांनी केली होती. 

या पार्श्‍वभूमीवर कृषीमंत्र्यांनी ग्रास कटर या कृषी अवजाराचा कृषी अभियांत्रिकी उपअभियान योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतल्याचे खलिफेयांनी सांगितले.